Thu, Jul 18, 2019 21:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आयआयटीतही शाकाहारी विरूद्ध मांसाहारी

आयआयटीतही शाकाहारी विरूद्ध मांसाहारी

Published On: Jan 17 2018 2:00AM | Last Updated: Jan 17 2018 1:02AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) हॉस्टेलमध्ये राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी वादग्रस्त फतवा काढण्यात आला आहे. मांसाहारी पदार्थ घेणार्‍या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमधील स्टीलचे ताट वापरु नये, त्याऐवजी त्यांनी मासांहारी जेवणासोबत मिळणार्‍या प्लास्टिक ट्रे प्लेट्सचा वापर करावा, असा ईमेल विद्यार्थ्यांना पाठवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, हा ईमेल आयआयटी प्रशासनाने पाठवलेला नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. 

मुंबई आयआयटीमधील हॉस्टेलमध्ये रेग्यूलर मेन्यूमध्ये शाकाहारी जेवणच मिळते. मांसाहारी जेवणासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. मांसाहारी जेवण हे प्लास्टिक ट्रे प्लेटमध्ये दिले जाते. हॉस्टेल नंबर 11 मधील स्टुंडट कौन्सिलने एक ईमेल पाठवला आहे. मांसाहारी जेवण घेणारे विद्यार्थी शाकाहारी विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या रेग्यूलर स्टीलच्या प्लेटचा वापर करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे मांसाहारी जेवण घेणार्‍यांनी प्लास्टिकच्याच ट्रेचा वापर करावा, असे या ईमेलमध्ये म्हटले आहे.

हॉस्टेल नंबर 11 मधील विद्यार्थ्यांनाच हा ईमेल पाठवण्यात आला असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मांसाहारी जेवण ज्या प्लास्टिक प्लेटमध्ये दिले जाते ते स्टीलच्या ताटापेक्षा आकाराने लहान असते, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. देशातील काही महाविद्यालयांमध्ये भोजनकक्षात मांसाहारी आणि शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था असल्याचे मी ऐकून आहे. पण आयआयटीसारख्या ठिकाणी असा दुजाभाव केला जातो हे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्याने दिली.