कोरेगाव-भीमा तपास केंद्राकडे नाही

Last Updated: Feb 19 2020 2:01AM
Responsive image


सिंधुदुर्गनगरी : पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव-भीमा येथे दलितांवर अन्याय झाल्याचा आक्षेप आहे. दलित बांधवांचा विषय कोरेगाव-भीमाशी संबंधित आहे. याचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही, केंद्राकडे देणारही नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. 18) येथे दिली.

गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत वरील ग्वाही त्यांनी दिली. याबाबत मी स्पष्ट करू इच्छितो, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत दलित बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही. दलितांशी संबंधित असलेले कोरेगाव-भीमा प्रकरण हा वेगळा विषय आहे. केंद्र सरकारने ज्या प्रकरणाचा तपास आपल्याकडून काढून घेतला आहे ते एल्गार प्रकरण आहे, कोरेगाव-भीमाचे नाही. त्यामुळे कृपा करून कोणीही गैरसमज करून घेऊ नये.

रिफायनरी हा विषय बंद झालेला आहे. त्यावर बोलण्याची गरज नाही. शिवसेनेचेनिर्णय आणि धोरण मी ठरवितो. त्यामुळे जाहिरात आली म्हणून शिवसेना बदलली असे होत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन ठाकरे यांनी यावेळी केले. 

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. ‘सामना’मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीवरून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेने या प्रकल्पाला पहिल्यापासूनच विरोध केला आहे. परंतु प्रकल्पासंदर्भात दै. ‘सामना’मध्येच अलीकडे जाहिरात आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सत्तेत असलेली शिवसेना रिफायनरी प्रकल्पाबाबत यू टर्न घेऊन आपली भूमिका बदलते की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. रिफायनरी प्रकल्प व्हावा, यादृष्टीने शिवसेनेची पावले पडत आहेत का, असे विचारले जात होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून सिंधुदुर्ग दौर्‍यावर होते. तेव्हापासून मुंबई, रत्नागिरी येथून आलेले पत्रकार रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री काय बोलणार हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत होते.

सोमवारी सकाळी 10 वाजता सिंधुदुर्गनगरी येथे मुख्यमंत्र्यांची  पत्रकार परिषद असल्याचे कळल्यानंतर हे उत्तर जाणून घेण्यासाठी मोठ्या संख्येने पत्रकारांची गर्दी झाली. अपेक्षेप्रमाणे दै. ‘सामना’मध्ये रिफायनरीसंदर्भात जाहिरात छापून आल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सामना’मध्ये बद्धकोष्टता दूर करण्याची जाहिरातही येते. त्याला आमचा पाठिंबा असतो असे नाही. शिवसेनेचे निर्णय आणि धोरण मी ठरवितो. ते ‘सामना’मधून मांडले जातात. त्यामुळे जाहिरात आली म्हणजे शिवसेना बदलली असे होत नाही. वेगवेगळ्या जाहिराती रोजच येत असतात.

मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणानंतर रिफायनरीबाबत काही चालू आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ठाकरे म्हणाले, अजिबात नाही. रिफायनरी हा विषय आता बंद झाला आहे. त्यावर बोलण्याची गरज नाही. माझ्याकडे याबाबत कुणीच आलेले नाही, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘एनआरसी’ला विरोध

सीएएबाबत नागरिकांना घाबरण्याची कोणतीही आवश्यकता नाही. हा कायदा केंद्राने लागू केला आहे. त्याची अंमलबजावणी देखील महाराष्ट्र शासन करेल. परंतु एनआरसी कायदा केंद्राने अजून संमत केलेला नाही आणि तो भविष्यात येणार देखील नाही. हा कायदा आला तर मुस्लिमांनाच नाही; तर हिंदू, आदिवासी, वंचित समाज यांनाही तो त्रासदायक ठरणार आहे. म्हणून केंद्र सरकारने याबाबत काहीही भाष्य केले नाही. प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना होते. त्याच अनुषंगाने हा मुद्दा आहे. परंतु याची पूर्ण पाहणी करूनच यात काय कलमे आहेत ते पाहूनच या कायद्याची महाराष्ट्र् शासन अंमलबजावणी करेल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.