Wed, Jul 17, 2019 08:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘ओखी’चा धोका टळला; एक बोट बेपत्ता, जीवितहानी नाही

‘ओखी’चा धोका टळला; एक बोट बेपत्ता, जीवितहानी नाही

Published On: Dec 05 2017 5:38PM | Last Updated: Dec 05 2017 9:01PM

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर भीतीचे वातावरण निर्माण करणारे ‘ओखी’ वादळ गुजरातकडे सरकल्याने राज्याचा धोका टळला आहे. या वादळामुळे राज्यात काही ठिकाणी पावसामुळे नागरिकांची गैरसोय झाली असली, तरी कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज्यातील 2 हजार 606 बोटींपैकी 2 हजार 605 बोटी सुरक्षित असून, एक बोट बेपत्ता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दक्षिणेकडील राज्यांत थैमान घातल्यानंतर ‘ओखी’ चक्रीवादळाने मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर धडक दिली. या वादळामुळे कोकणातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली होती. कोकणातील विविध भागांत दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारी तीन वाजता भरती येणार असल्याने मुंबईत भीतीचे वातावरण होते. मात्र, धोका टळल्याने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेनेही सुटकेचा नि:श्‍वास टाकला.

या वादळामुळे अन्य राज्यांतील 142 बोटींवरील 2 हजार 285 मच्छीमार कोकणातील देवगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बंदरांत अडकले आहेत. या मच्छीमारांची व्यवस्था राज्य सरकारकडून करण्यात आली असून, धोका टळल्यानंतर त्यांच्या बोटींना डिझेल पुरवून त्यांच्या राज्याकडे रवाना करण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले.