Fri, May 24, 2019 08:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रामाणिक, निष्कलंक, स्वच्छ

प्रामाणिक, निष्कलंक, स्वच्छ

Published On: Apr 25 2018 2:03AM | Last Updated: Apr 25 2018 1:51AMमुंबई : खास प्रतिनिधी

प्रामाणिकता, निष्कलंक चारित्र्य आणि स्वच्छ प्रतिमा या गुणांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इतिहासात नोंद होईल, अशी स्तुतीसुमने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुख्यमंत्र्यांवर उधळली. विकासाच्या राजकारणाला उत्तर देता येत नसल्यानेच महाराष्ट्रात आता जातीचे राजकारण सुरू झाले आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणार्‍या मॅन ऑन मिशन या पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाले. संत साहित्याचे अभ्यास सदानंद मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्राला विकासाची दिशा देण्याचे काम गेल्या साडेतीन वर्षात केले असून फडणवीस यांच्या रूपाने राज्याला योग्य वेळी योग्य मुख्यमंत्री मिळाल्याची भावना सदानंद मोरे यांनी व्यक्त केली. 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कामाचे विश्‍लेषण या पुस्तकाचे लेखक आशिष चांदोरकर यांनी केले आहे. या सरकारने जलसंवर्धनाच्या क्षेत्रात अजोड कामगिरी केली असून  मराठवाड्यासह, विदर्भात टँकर्सची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे, याखेरीज जलयुक्त शिवाराचे काम फडणवीस सरकारने परिणामकारकरितीने केले आहे, असे गडकरी म्हणाले.  

गेली वीस वर्षे राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प रखडल्याने त्यातील  भांडवली गुंतवणूकही मृत झाल्यातच जमा होती. हे अपुरे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी  मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाठपुरावा केल्याने त्यापैकी 108 प्रकल्प आता मार्गी लागले असून त्यातील साठ टक्के प्रकल्प येत्या जूनपर्यंत पूर्ण होतील, आणि त्यानंतर सिंचनाखालील क्षेत्र 18 वरून 40 टक्क्यांवर  पोहचेल, ाशी ग्वाही गडकरी यांनी दिली. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीलाही याचा लाभ होणार असल्याने आत्महत्याग्रस्त भागालाही दिलासा मिळणार आहे. राज्यातील पाच लाख शेतकर्‍यांना प्राधान्याने वीज जोडण्याचे उल्लेखनीय 
कामही सरकारने केल्याचे गडकरींनी नमूद केले.

याप्रसंगी व्यासपीठावर अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनंगटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आदि उपस्थित होते. प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. मोरे म्हणाले, देवराष्टे्र या गावातून आलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी या राज्याची स्थापना केली. त्यामुळे देवराष्ट्रे ते देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राचा प्रवास महत्त्वपूर्ण आहे. काम करणारे मुख्यमंत्री म्हणून  फडणवीस यांनी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रालाही अशाच तरूण नेतृत्वाची गरज होती. मुख्यमंत्री फडणवीस ती समर्थपणे ही जबाबदारी सांभाळत आहेत. राज्याला योग्य वेळी, योग्य मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रुपाने मिळाल्याचेही  मोरे म्हणाले. 

Tags : Mumbai, Nitin Gadkari, praised, Chief Minister Devendra Fadnavis, Mumbai news,