होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राणेंना राज्यसभा नको, विधानसभाच; नितेश राणेंचे सूचक ट्विट

राणेंना राज्यसभा नको, विधानसभाच; नितेश राणेंचे सूचक ट्विट

Published On: Mar 03 2018 2:30PM | Last Updated: Mar 03 2018 2:30PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंना भाजपकडून राज्यसभेवर ऑफर देण्यात आली. यावर विचार करुन निर्णय देऊ असे राणेंनी सांगितल्याने ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. दरम्यान, राणेंनी केंद्रात नाही तर महाराष्ट्रातच रहावेत असे ट्विट आमदार नितेश राणे यांनी केले आहे. या ट्विटमुळे राणेंचा भाजपच्या ऑफरला नकार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

नितेश राणेंनी ट्विटमधून म्हटले आहे की ,‘राणेंनी राज्याच्या राजकारणात रहावे ही समर्थकांची भावना आहे. महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. आम्हाला त्यांना राज्यसभेत नाही तर विधानसभेत पाहण्याची इच्छा आहे.’ राणे समर्थकांची ही भावना ट्विटच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर मांडली असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

‘भाजपने खासदारकीची ऑफर दिली आहे. त्यावर मी विचार करून निर्णय घेईन, तसे मी भाजपाध्यक्षांनाही सांगितले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविण्याबाबत अजून विचार केलेला नाही. मात्र, निवडणुकांच्या सहा महिने आधी याबद्दल विचार करून निर्णय घेऊ, सध्या तरी त्यांची खासदारकीची ऑफर आहे. त्यानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळेल,’ अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली अमित शहांच्या भेटीनंतर दिली होती.