Thu, Jun 20, 2019 20:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निपाहचा धसका : महाराष्ट्रातून केरळला जाणारे पर्यटक घटले

निपाहचा धसका : महाराष्ट्रातून केरळला जाणारे पर्यटक घटले

Published On: May 25 2018 1:22AM | Last Updated: May 25 2018 12:55AMमुंबई : प्रतिनिधी

केरळमधील निपाह विषाणूचा सर्वांनीच धसका घेतला असून केरळच्या पर्यटनावर त्याचा परिणाम झाला आहे. निपाहच्या भीतीने महाराष्ट्रातून केरळला जाणार्‍या पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केले आहे. तर तिकडे गेलेले पर्यटक देखील ट्रिप मधेच सोडून घरी परतू लागले आहेत. परतणार्‍या पर्यटकांची योग्य ती तपासणी करूनच त्यांना पाठवले जात असल्याची माहिती त्रिवेंद्रम पर्यटन कार्यालयातून देण्यात आली.

केरळ हे अत्यंत लोकप्रिय असे पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो हौशी पर्यटक त्याठिकाणी भेट देतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून केरळमधील काही भागात निपाह या विषाणूच्या दहशतीमुळे पर्यटक केरळमधून काढता पाय घेऊ लागले आहेत. अनेकांनी आपली बुकिंग रद्द केली आहेत.

मुळातच मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी केरळ पर्यटक  कमी होते. त्यात निपाहच्या भीतीने सध्या केरळचे पर्यटन पूर्णपणे थंडावले आहे. मुंबई कफ परेड येथील पर्यटन कार्यालयामध्ये केरळला जाण्यासाठी दिवसाला कमीत कमी 10 ते 15 चौकशी कॉल यायचे, पण सध्या ही चौकशी पूर्णपणे थांबली आहे. 

या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार 2013 या सालात केरळला महाराष्ट्रातून जाणार्‍या पर्यटकांची संख्या सुमारे 10 लाखांच्या घरात होती. परंतु ही संख्या या वर्षी निम्म्याहून कमी झाली आहे. त्यातच निपाह विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने आता तर केरळ पर्यटन पूर्णपणे थंडावले आहे.