Mon, Aug 19, 2019 09:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पतीवर उगारल्या माहेरच्यांनी तलवारी!

पतीवर उगारल्या माहेरच्यांनी तलवारी!

Published On: Jun 20 2018 2:01AM | Last Updated: Jun 20 2018 1:27AMउल्हासनगर : वार्ताहर

उल्हासनगर परिमंडळ चार उपायुक्त कार्यालयाच्या अंतर्गत येणार्‍या महिला तक्रार निवारण केंद्रात नवर्‍या मुलाची हत्या करण्यासाठी मुलीकडील मंडळींनी थेट तलवारी काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र मध्यवर्ती पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी पोलिसांनी मुलगा आणि मुलीकडील मिळून नऊ जणांना अटक केली आहे. 

बदलापूर येथील शिरगावमध्ये विकास विश्वनाथ शिरसाठ हा राहतो. विकास याचा 2016 साली नेहा हिच्याशी आंतरजातीय विवाह झाला होता. काही कौटुंबिक कलाहांमुळे त्याने उल्हासनगर महिला तक्रार निवारण कक्षात मे 2018 मध्ये त्याची पत्नी नेहा, सासरा विनायक चांगले, सासू मंगल चांगले, मेहुणा समीर चांगले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. याबाबतची दोनदा सुनावणी झाली. मात्र मुलगी ही विकासकडे नांदण्यास तयार नव्हती. सोमवारी दुपारी सुनावणीसाठी दोघेही पती-पत्नी समोर आले. मात्र त्यांच्यात जोरदार वाद झाला. 

हा वाद ऐकून दोन्ही बाजूचे 14 ते 15 जण महिला तक्रार निवारण कक्षात घुसले आणि आपापसात जोरदार भांडण करू लागले. त्यांना महिला तक्रार निवारण कक्षात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस नाईक सुलक्षणा चंदनशिवे, महिला पोलीस उपनिरीक्षक शेलार, महिला पोलीस शिपाई जोशी, समुपदेशिका संजीवनी भानुशाली यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. यावेळी महिला पोलीस शिपाई जोशी यांनी एकाच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. या धक्काबुक्कीत जोशी आणि भानुशाली यांच्या हाताला मुका मार लागला. 

ही आरडा ओरड आणि शिवीगाळ बाजूलाच असलेल्या मध्यवर्ती पोलीस ठाणे, अतिक्रमण कक्ष आणि नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या पोलिसांना ऐकू आली. त्यांनी वाद घालणार्‍यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता 4 ते 5 जण पोलिसांना धक्का मारून पळून जाण्यात यशस्वी झाले. परंतु धुळे येथून आलेले सचिन मुर्तडकर, योगेश मुर्तडकर, राहुल मुर्तडकर, मुंबईस्थित महेश करपे, बदलापूर येथे राहणारे समीर चांगले, विकास शिरसाट, आकाश शिरसाट, बंडू शिरसाट आणि अमोल शिरसाट यांच्या मुसक्या आवळण्यात मध्यवर्ती पोलिसांना यश आले.