Tue, Jul 16, 2019 23:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › न्यूज१८ - लोकमतच्या विरोधात विधान परिषदेत हक्‍कभंग दाखल

न्यूज१८ - लोकमतच्या विरोधात विधान परिषदेत हक्‍कभंग दाखल

Published On: Mar 01 2018 9:10PM | Last Updated: Mar 01 2018 9:10PMमुंबई : प्रतिनिधी

विधिमंडळात प्रश्‍न विचारण्यासाठी दलाली घेतली जात असल्याचा गंभीर आरोप करणारी ऑडिओ क्‍लिप न्यूज 18-लोकमत या मराठी वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आले. कोणतीही सत्यता न पडताळता विरोधी पक्षनेते तसेच विधिमंडळाची बदनामी करणारे वृत्त प्रसारित केल्याबद्दल या वृत्तवाहिनीच्या विरोधात विधान परिषदेत हक्‍कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हा प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे पाठवत एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

राष्ट्रवादीचे गटनेते हेमंत टकले यांनी न्यूज 18-लोकमत मराठी वृत्तवाहिनीवर महागौप्यस्फोट या मथळ्याखाली एक निराधार वृत्त प्रसारित करण्यात आले. सदर वृत्तात एक कथित बांधकाम व्यावसायिक आणि कथित मध्यस्थ अशा दोन त्रयस्थ व्यक्‍तींमधील दूरध्वनी संभाषणाची मुद्रित ध्वनिचित्रफीत ऐेकवून विरोधी पक्ष नेते व विधिमंडळावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याची पडताळणी न करताच त्यासंदर्भातील वृत्त प्रसारित करण्यात आल्याने वृत्तवाहिनीचे मालक, संपादक, वृत्तसंपादक, वृत्तनिवेदक, संबंधित वार्ताहर तसेच एचडीआयएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पुरंदरे यांच्याविरुद्ध हक्‍कभंग प्रस्ताव सादर करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. 

अशाने लोकशाहीवरचा विश्‍वास उडेल : सभापती 

विधिमंडळाच्या इतिहासात असा प्रकार कधी घडला नाही. या प्रकारामुळे आपल्याला वाईट वाटले. आपण महाराष्ट्राच्या इतिहासात काही चुकीचे करतो का, असा प्रश्‍न यातून निर्माण होतो. विधानभवनाच्या कार्यपद्धतीवर झालेला हा आरोप घात असून अशाने लोकशाहीवरचा विश्‍वास उडेल की काय, अशी भीती वाटत असल्याचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले.