Sun, Aug 25, 2019 12:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उपअधीक्षकांना बदल्यांची नववर्ष भेट

उपअधीक्षकांना बदल्यांची नववर्ष भेट

Published On: Dec 31 2017 2:07AM | Last Updated: Dec 31 2017 1:37AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक व सहायक आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या 35 अधिकार्‍यांच्या बदल्या, प्रतिनियुक्ती आणि पदोन्नतीचे आदेश शनिवारी काढत अधिकार्‍यांना प्रशासनाने नववर्षाचे गिफ्ट दिले आहे. या बदल्यांमुळे मुंबई पोलीस दलाला चार सहायक आयुक्त मिळाले असून मुंबईमध्ये नियुक्ती मिळविण्यात नऊ जणांची वर्णी लागली आहे.

नागपूर शहरचे सहायक आयुक्त ज्ञानेश देवडे यांच्यासह संदीप डाळ यांना पदोन्नतीने मुंबईमध्ये सहायक आयुक्त, तर निलेशकुमार राऊत यांची नवी मुंबईत सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वर्ध्यातील आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक दिलीप सावंत यांची मुंबईत सहायक आयुक्तपदावर बदली करण्यात आली आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अप्पर पोलीस अधीक्षक सुनिता नाशिककर यांना पदोन्नती देत समाजकल्याण विभाग, मुंबईच्या जातपडताळणीच्या उपअधीक्षक पदावर प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे.

कोल्हापूरच्या जयसिंगपूर उपविभागात उपविभागीय अधिकारीपदी बदली करण्यात आलेल्या जितेंद्र जाधव यांची येथील जिल्हा जातपडताळणी पथकाच्या उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी रमेश सरवदे यांची मुंबईमध्ये सहायक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली असून नवी मुंबईचे सहायक आयुक्त कृष्णांत पिंगळे यांच्या बदलीने कोल्हापूरच्या जयसिंगपूर उपविभागाला नवा अधिकारी मिळाला आहे. तर सोलापूरमधील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहाचे सहायक समादेशक मनोहर गवळी यांची कोल्हापूरच्या आयआरबीचे सहायक समादेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

धुळे शहर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी हिम्मत जाधव यांची परभणी मुख्यालयात उपअधीक्षक पदी बदली करण्यात आली असून त्यांच्या रिक्त जागी अमरावतीच्या दर्यापूर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांची उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षकपदी झालेली बदली रद्द करून नवीन नियुक्ती देण्यात आली आहे. अकोला मुख्यालयातील उपअधीक्षक प्रियांका शेलार यांची पालघरमधील समाज कल्याण विभागातील जातपडताळणीच्या उपअधीक्षक पदावर प्रतिनियुक्तीने नेमणूक करण्यात आली आहे. 

राज्य गुप्तवार्ता विभाग, नागपूरचे अप्पर उपआयुक्त रमाकांत माने यांची पुण्याच्या टीआरटीआयचे उपअधीक्षक म्हणून तर, नागपूर यूओटीसीचे उपअधीक्षक दीपक पाटील यांची राज्य पोलीस मुख्यालय नियंत्रण कक्षात उपअधीक्षक पदावर नेमणूक करण्यात आली आहे. सांगलीतील मिरजच्या उपविभागीय अधिकारी पद्मजा चव्हाण यांची ठाणे शहरच्या सहायक आयुक्तपदी तर, परभणीतील आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक सोमनाथ मालकर यांची औरंगाबाद ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षकपदाचा कार्यभार सोपविण्यात आला  आहे.

 

चंद्रपूर येथील आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक भिमराव टेळे यांची वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून बुलढाणा पोलीस मुख्यालयातील उपअधीक्षक छगन इंगळे यांची अकोल्याच्या अकोट उपविभागीय पोलीस अधिकारीपदी, तर अमरावती ग्रामीणच्या दर्यापूर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी आनंद नेर्लेकर(कांबळे) यांची पदोन्नतीने रायगडच्या जातपडताळणी समाजकल्याण विभागाच्या उपअधीक्षक नियुक्ती करण्यात आली आहे.

नागपूर शहरच्या सहायक आयुक्त रुक्मिणी गलांडे यांची ठाणे जिल्ह्यातील आदिवासी विकास व प्रशिक्षण संस्थेच्या उपअधीक्षकपदी, तर पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूरच्या उपअधीक्षक शितल वंजारी-झगडे यांची सोलापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

जालना पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या उपअधीक्षक वंदना नारकर यांची पोलीस अधीक्षक दर्जाचे पद अवनत करून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबईच्या उपअधीक्षकपदी, तर सोलापूर शहरच्या सहायक आयुक्त शर्मिष्ठा वालावरकर यांची गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे करण्यात आलेली बदली रद्द करण्यात आली आहे.

जळगावातील चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी अरविंद पाटील यांची प्रतिनियुक्तीने येथील समाजकल्याण विभागातील जात पडताळणीच्या उपअधीक्षक, तर लातूरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक संगिता लायनल शिंदे अल्फान्सो यांची प्रतिनियुक्तीने ठाणे जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाच्या जातपडताळणीच्या उपअधीक्षक पदावर नेमणूक करण्यात आली आहे.