Mon, May 20, 2019 22:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकसभेची तयारी सुरू; नवी मतदार यादी होणार जाहीर

लोकसभेची तयारी सुरू; नवी मतदार यादी होणार जाहीर

Published On: Aug 27 2018 1:38AM | Last Updated: Aug 27 2018 9:00AMमुंबई : प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची सरकारी पातळीवरची तयारी सुरू झाली आहे. राजकीय पातळीवरून पक्षांच्या वतीने नेत्यांचे दौरे, पक्षाचे मेळावे सुरू असतानाच निवडणूक आयोगाच्या पातळीवर मतदार यादी सुधारणांचा राज्यव्यापी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आता जी मतदार यादी तयार होईल त्याच यादीवर आधारित लोकसभा निवडणुका होणार असल्याने पक्षाच्या पातळीवर कार्यकर्त्यांना सतर्क  रहावे लागणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम निश्‍चित करून दिला आहे. त्यानुसार येत्या दि. 1 सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यावर दावे व हरकती स्वीकारण्यासाठी तब्बल दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. शनिवार दि. 1 सप्टेंबर ते बुधवार दि. 31 ऑक्टोबर या काळात  मतदारांना प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे पाहता येईल.

तसेच काही दुरुस्ती वा सुधारणा करावयाच्या असल्यास तसेच यादीबाबत काही आक्षेप असल्यास तेही घेता येईल.  त्यासाठी  आयोगाने ठरवून दिलेल्या नमुन्यात अर्ज सादर करावा लागणार आहे. यादीवर ज्या हरकती घेण्यात आल्या आहेत त्या शुक्रवार दि. 30 नोव्हेंबर 2018 पूर्वी निकालात काढाण्यात येणार आहेत.

नव्या वर्षात नवी यादी

त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून गुरुवार दि. 3 जानेवारी 2019 पूर्वी मतदार यादीची छपाई पूर्ण करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. 4 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. लोकसभेच्या निवडणुका मे 2019 मध्ये घेण्याची नियोजित मुदत आहे. निवडणूक कधी घ्यायची याचा निर्णय आयोगाकडून जाहीर होईल. मात्र लोकसभेच्या निवडणुका याच मतदार यादीच्या आधारावर होणार हे निश्‍चित आहे. 

राजकीय पक्षानाही आवाहन

राजकीय पक्षांनी बुथ पातळीवर( मतदान केंद्र) मतदार प्रतिनिधींची नियुक्ती करावी. सरकारने जे बुथ पातळीवरील मतदान अधिकारी नेमले आहेत त्यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचेही आवाहन निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांनाही केले आहे.

काय आहे प्रक्रिया

> 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्ष पूर्ण करणार्‍यांना मतदार यादीत नाव दाखल करता येईल.

> दि. 1 जानेवारी 2001 वा त्यापूर्वी ज्याचा जन्म झाला आहे व जो सामान्य रहिवासी आहे ती व्यक्ती नाव नोंदविण्यासाठी पात्र ठरणार.

> ज्यांना मतदार यादीतील नावे वा इतर तपशिलाबाबत आक्षेप असेल तो वर दिलेल्या मुदतीत त्या त्या संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी
अधिकार्‍याकडे घेता येईल.

> मयत, दुबार नोंदणी, स्थलांतरीत झालेल्या मतदारांची नावे या यादीतून वगळण्यात येतील. या वगळलेल्या नावांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात
प्रसिध्द केली जाणार आहे.

> ऑनलाईन नाव नोंदणी व तपशिलात बदल करण्याची सुविधाही उपलब्ध प्रारुप मतदार यादीही संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.