Fri, Apr 26, 2019 00:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘त्याची’ सरकार दरबारी नोंदणी ‘ती’

‘त्याची’ सरकार दरबारी नोंदणी ‘ती’

Published On: Feb 16 2018 10:44AM | Last Updated: Feb 16 2018 10:44AMधारावी : वार्ताहर

पालिकेचा ढिसाळ कारभार एका चिमुरड्यासाठी डोकेदुखी ठरल्याची घटना धारावीत उघडकीस आली आहे. जन्म दाखल्यावर मुला ऐवजी मुलगी म्हणून नोंद झाल्याने ही चूक सुधारण्यासाठी धारावीतील कोथमिरे कुटुंबीय मागील 3 वर्षांपासून कागदी घोडे नाचवत आहेत. 3 वर्षे 4 महिन्यांच्या वेदांत कोथमिरे याला या प्रकारामुळे शाळेतही प्रवेश मिळेनासा झाला आहे.

11 ऑक्टोबर 2014 रोजी धारावीतील एका खासगी रुग्णालयात जन्माला आलेल्या मुलाच्या जन्म दाखल्यावर पालिकेच्या जी.उत्तर विभाग कार्यालयातील कर्मचार्‍याने मुलगी म्हणून नोंद केली. पालकांनी ही चूक लक्षात आणून दिल्यानंतरसुद्धा जन्मदाखल्यातील चूक सुधारण्यात आली नाही. मुलाचे पालक पालिका कार्यालय, न्यायालय तसेच रुग्णालयाचे खेटे घालत आहेत. तरीही दखल घेतली जात नसल्याने वेदांतला शाळेपासून वंचित रहावे लागत आहे. पालिकेच्या जी.उत्तर विभागाचे अधिकारी आपली चूक कबुल करण्याऐवजी चालढकल करीत असल्याचा आरोप मुलाचे वडील गणेश कोथमिरे यांनी केला आहे.

वाशीनाका येथील एमएमआरडीए कॉलनीत राहणार्‍या गणेश कोथमिरे यांनी प्रसूतीसाठी पत्नीला धारावीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच दिवशी तिची प्रसूती झाली आणि मुलगा झाला. याचा तपशील रुग्णालयाने पालिका जी.उत्तर विभागाकडे धाडला. त्यामध्ये मुलगा झाल्याची स्पष्ट नोंद करूनसुद्धा पालिका कर्मचार्‍याने मुलाची नोंद मुलगी म्हणून केली. यानंतर पालिकेच्या महाभागाने जेथे राहता त्या विभागातून दाखला मिळेल, असे सांगितले. त्यानंतर पालिका एम (ई) विभागाकडे धाव घेतली. तेथील अधिकार्‍याने ज्या विभागात जन्म झाला त्या विभागातून दाखला देण्यात येतो, असे सांगितले. त्यामुळे कोथमिरे यांनी पालिका जी उत्तर विभागाकडे पुन्हा धाव घेतली. मात्र अद्यापपर्यंत दाखला मिळालाच नाही.