Sun, Apr 21, 2019 05:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नववर्षात सुपरमून, ब्ल्यूमून, ग्रहणे, उल्कावर्षाव

नववर्षात सुपरमून, ब्ल्यूमून, ग्रहणे, उल्कावर्षाव

Published On: Dec 26 2017 1:52AM | Last Updated: Dec 26 2017 1:03AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी 

पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार्‍या नव्या वर्षात म्हणजे 2018 मध्ये खगोलप्रेमींना सुपरमून, ब्ल्यूूमून, उल्कावर्षाव अशा अनेक खगोलशास्त्रीय घटनांचा अनुभव घेता येणार आहे. या वर्षात तीन सूर्यग्रहणे, दोन चंद्रग्रहणे, तीन गुरुपुष्यामृत योग आणि गणेश भक्तांसाठी तीन अंगारकी चतुर्थी आहेत. चाकरमानी आणि विद्यार्थ्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे या वर्षात केवळ गुढीपाडवा आणि रामनवमी हे दोनच सण रविवारी येत असल्याने यंदा सुट्ट्यांची चंगळ होणार असल्याची रोचक माहिती प्रसिद्ध खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दैनिक पुढारीला दिली. 

2018 मध्ये तीन सूर्यग्रहणे व दोन चंद्रग्रहणे अशी एकूण पाच ग्रहणे होणार आहेत.  त्यातील दोन खग्रास चंद्रग्रहणे 31 जानेवारी व 27 जुलै या दिवशी भारतातून दिसणार आहेत. 31 जानेवारी रोजी खग्रास स्थितीतच चंद्रोदय होताना दिसणार असल्याने छायाचित्रकारांना मोठी पर्वणी असणार आहे. 31 जानेवारी रोजी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ तीन लक्ष अठ्ठावन्न हजार किलोमीटर अंतरावर येणार असल्याने त्या दिवशी सुपरमूनचे दर्शन घडणार आहे. जानेवारी 2018 मध्ये दोन पौर्णिमा येत असल्याने 31 जानेवारीच्या चंद्राला ब्ल्यूमून संबोधता येणार आहे. त्यामुळे 31 जानेवारीला रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात चंद्र  पाहायला विसरू नका. या दिवशी ग्रहणाची खग्रास  स्थिती, सुपरमून आणि ब्ल्यूमून असा त्रिवेणी योग असल्याने 31 जानेवारीला चंद्र पाहायला विसरू नका, असे आवाहन त्यांनी केले. 

4 जानेवारी रोजी भूतप तारकासमूहातून, 22 एप्रिल रोजी स्वरमंडल तारकासमूहातून, 5 मे रोजी कुंभ राशीतून, 20 जून रोजी भुजंगधारी तारकासमूहातून, 28 जुलै रोजी कुंभ राशीतून, 22 ऑक्टोबर रोजी मृग नक्षत्रातून, 17 नोव्हेंबर रोजी सिंह राशीतून आणि 13 डिसेंबर रोजी मिथुन राशीतून उल्कावर्षाव होणार आहे. 31 जुलै रोजी मंगळ, 10 मे रोजी  गुरू,  27 ऑक्टोबर रोजी शुक्र आणि 27 जून रोजी शनी पृथ्वीच्या जवळ येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 9 ऑगस्ट, 6 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबर असे तीन गुरुपुष्ययोग आहेत. गणेशभक्तांसाठी  3 एप्रिल, 31 जुलै आणि 25 डिसेंबर अशा तीन अंगारकी चतुर्थी येत आहेत.  16 मे ते 13 जून या कालात ज्येष्ठ अधिकमास येत असल्याने वटपौर्णिमेपासून  पुढील  काळात येणारे सण 20 दिवस उशिरा येणार  असल्याचे त्यांनी सांगितले.