Wed, May 22, 2019 14:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षण : ९ ऑगस्टच्या बंदमधून नवी मुंबईची माघार

मराठा आरक्षण : बंदमधून नवी मुंबईची माघार

Published On: Aug 07 2018 2:47PM | Last Updated: Aug 07 2018 2:47PMनवी मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यात ९ ऑगस्टला सकल मराठा समाजाच्यावतीने बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, नवी मुंबईत बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे सकल मराठा समाजाकडून जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे. २५ जुलैच्या बंद दरम्यान हिंसाचार झाल्याने सामाजिक तेढ निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सकल मराठा समाजाच्यावतीने २५ जुलैला बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमध्ये काही समाजकंटकांनी घुसून मराठा समाजाचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचादेखील प्रयत्न झाला. त्यानंतर नवी मुंबईतील वातावरण तणावपूर्ण व संवेदनशील बनले आहे.  अशा परिस्थितीत पुन्हा काही अनुचित होऊ नये यासाठी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांशी चर्चा करुन ९ ऑगस्टला नवी मुंबईत कोणतेही आंदोलन किंवा बंद असणार नसल्याचे नवी मुंबईतील सकल मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला २६ जुलैरोजी नवी मुंबईतील कंळबोली आणि कोपरखैरणे भागात हिंसक वळण लागले होते. यावेळी झालेल्या आंदोलनात कोपरखैरणे गावातील पार्किंग करुन ठेवलेल्या दुचाकीसह चारचाकी 100 हुन अधिक वाहने फोडण्यात आली होती.