Wed, Mar 27, 2019 02:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ सांगणारे अ‍ॅप!

इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ सांगणारे अ‍ॅप!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

सरकारी कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्याचे धोरण राज्य सरकारने आखले आहे. त्यासाठी रोजच्या व्यवहारात वापरण्यात येणार्‍या इंग्रजी शब्दांचा मराठीत अर्थ आणि मराठी शब्दांचा इंग्रजीत अर्थ सहज उपलब्ध होण्यासाठी भाषा संचालनालयाने शासन शब्दकोश अ‍ॅप तयार केले आहे. शासन शब्दकोश भाग - एक असे या मोबाईल अ‍ॅपला नाव देण्यात आले असून, यात सरकारी कामकाजात वापरण्यात येणार्‍या निवडक 72 हजार 171 पर्यायी शब्दांचा समावेश करण्यात आला आहे.

भाषा संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या शब्दकोशांपैकी शासनव्यवहार कोश, प्रशासन वाक्यप्रयोग, न्यायव्यवहार कोश व कार्यदर्शिका हे चार निवडक शब्दकोश पहिल्या टप्प्यात या मोबाईल अ‍ॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपयोजकाद्वारे शासनव्यवहारात व न्यायव्यवहारात वापरण्यात येणार्‍या इंग्रजी शब्दांना मराठीत अर्थ व पर्याय आणि मराठी शब्दांना इंग्रजीत अर्थ व पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. दिवसेंदिवस माहिती तंत्रज्ञानात होत असलेला बदल विचारात घेता, मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला जावा या उद्देशाने भाषा संचालनालयाने, निवडक शब्दकोशांचा समावेश असलेला शासन शब्दकोश हे अ‍ॅप तयार केले आहे.

शासन शब्दकोश मोबाईल अ‍ॅपमध्ये राज्य व केंद्र सरकारचे अधिनियमसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सध्या 750 शासकीय अधिनियम उपलब्ध आहेत. या अधिनियमाची पीडीएफ स्वरूपातील मराठी प्रत उपलब्ध आहे ती डाऊनलोड सुद्धा करता येऊ शकते.भाषा संचालनालयाने मे 1973 मध्ये पहिला शासनव्यवहार कोश प्रकाशित केला आणि शासकीय व्यवहारात मराठीचा वापर रुजविण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर नवे शब्द, नव्या परिभाषांनी व्यवहारातील मराठी कितीतरी समृद्ध होत गेली. अनेक शासकीय शब्दांना या कोशाद्वारे नवे पर्यायी शब्द दिले जावेत, असा भाषा संचालनालयाचा प्रयत्न आहे. एकदा हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यास इंटरनेटशिवाय कधीही वापरता येणार आहे. 

Tags : shasan shabdkosh-1, Marathi words, English words, App


  •