होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीपीआयसह इतर संघटनांचा नेतान्याहूंच्या  दौर्‍याला विरोध

सीपीआयसह इतर संघटनांचा नेतान्याहूंच्या  दौर्‍याला विरोध

Published On: Jan 19 2018 2:11AM | Last Updated: Jan 19 2018 1:34AMमुंबई : प्रतिनिधी 

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या भारत दौर्‍याला सीपीआयसह विविध सामाजिक संघटनांनी विरोध करत आझाद मैदानात निदर्शने केली. नेतान्याहू 18 जानेवारीपासून मुंबई दौर्‍यावर आले आहेत. नेतन्याहू यांनी भारत सोडून परत जावे, अशी मागणी करीत भाकपचे प्रकाश रेड्डी, माकपचे शैलेंद्र कांबळे, तुषार गांधी, भारिप बहुजन महासंघाचे ज.वि.पवार, ज्येष्ठ पत्रकार हसन कमाल, मिलींद रानडे, ज्योती बडेकर वासुदेवन, फिरोज मिठीबोरवाला, जावेद आनंद यांनी गुरूवारी आझाद मैदानात एकत्रित जमून निदर्शने केली.

नेतन्याहू यांच्याविरोधात देशभरात निदर्शने करण्यात येणार आहेत. न्याय, शांती व मानवतेवर विश्वास ठेवणार्‍या सर्वांनी  या दौर्‍याला विरोध करण्याचे आवाहन प्रकाश रेड्डी यांनी यावेळी केले.  मुंब्रा-कौसा येथे दारूल उलूम मखदुम, गरीब नवाज अश्रफिया यांच्यातर्फे मौलाना जमाल अहमद सिद्दीकी, मौलाना हिदायुत्तला खान, मौलाना वारीस जमालही यावेळी उपस्थित होते.

इस्त्राईलचा वापर भारताला दहशतवादाशी लढताना होईल, लष्करी लाभ मिळेल व शेती क्षेत्रासाठी लाभ होईल, अशी बतावणी केंद्र सरकार करत असले तरी परिस्थिती मात्र विपरीत आहे. इस्त्राईल या देशाची स्थापनाच दहशतवादावर झालेली आहे, असे प्रकाश रेडडी यांनी सांगितले.

नेतन्याहूंची धोरणे राबवण्याचा नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. जगात लोकशाहीविरोधी वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला जात असून देशातील आंबेडकरवादी नागरिकांनी याला कडाडून विरोध केला आहे, असे माकपचे शैलेंश कांबळे यांनी सांगितले.नेतन्याहू दिल्लीत येऊन महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करतात, ही चुकीची व दुटप्पीपणाची बाब आहे. मोदींनी त्यांच्यासाठी लाल गालीचा अंथरला असला तरी तो गालीचा पॅलेस्टाईनच्या नागरिकांच्या रक्ताने माखलेला आहे, अशी टीकाही प्रकाश रेड्डी यांनी केली.