Sat, Jul 20, 2019 10:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नेरूळ-उरण पहिल्या पाच स्थानकांपर्यंत लोकल?

नेरूळ-उरण पहिल्या पाच स्थानकांपर्यंत लोकल?

Published On: May 14 2018 1:53AM | Last Updated: May 14 2018 1:31AMमुंबई : प्रतिनिधी

नवी मुंबईला उरण शहराशी जोडणार्‍या सीवूड-उरण या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा खारकोपरपर्यंतचा जवळपास 12 किमीचा पहिला टप्पा पूर्ण तयार झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील पहिल्या पाच स्थानकांपर्यंत लोकलसेवा सुरू करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने दर्शविली आहे. तसेच याबाबतीत सिडकोला कळवण्यात आले असून पुढील महिनाभरात या मार्गावरील खारकोपर स्थानकापर्यंत लोकलसेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

सिडकोने जुलै 1997 मध्ये नेरूळ-उरण या 27 किमी लांबीच्या  रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार केला होता. अखेर जून 2012 पासून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. सिडको आणि रेल्वे यांच्या संयुक्त सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या या मार्गावर 10 स्थानके आहेत. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च दोन हजार कोटींच्या घरात आहे. या संपूर्ण मार्गावर चार उड्डाणपूल बांधण्यात येणार असून या मार्गावरील पाचव्या क्रमांकाच्या खारकोपर स्थानकाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यापुढील चार किलोमीटरच्या पट्ट्यात खारफुटी आणि भूसंपादनाचा अडथळा निर्माण झाल्याने हे काम रखडले होते. पण, आता हा अडथळाही दूर झाल्याने पुढील टप्प्यासाठी सिडकोने कंबर कसली आहे. नेरूळ-उरण मार्गावर एकूण 10 रेल्वे स्थानके आहेत. यात नेरूळ-सीवूड्स, सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, डोंगरी आणि उरण या स्थानकांचा समावेश आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील पाच स्थानकापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. असून पुढील महिनाभरात पहिल्या पाच स्थानकांपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे आणि सिडकोने घेतला आहे. नेरुळ-उरण या मार्गावरील तिसर्‍या क्रमांकाच्या तरघर स्थानकाचे काम अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.