Thu, Aug 22, 2019 08:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेजारणीनेच पळवले दोन महिन्यांचे मूल

शेजारणीनेच पळवले दोन महिन्यांचे मूल

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 27 2018 12:57AMमुंबई : प्रतिनिधी

अपहरणाच्या गुन्ह्यात पळून गेलेल्या शबाना हारुण शेख ऊर्फ खान या 25 वर्षीय महिलेस शुक्रवारी भायखळा पोलिसांनी अटक केली. तिच्याविरुद्ध अपहरणाच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून तिच्या तावडीतून एका दोन महिन्यांच्या मुलाची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे. या मुलाला त्याच्या तक्रारदार आईकडे सोपविण्यात आले आहे. 

शकीला बानू शहा ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत रे रोड परिसरातील झोपडपट्टीत राहते. तिला दोन महिन्यांचा फैजान या मुलासह सात वर्षांची एक मुलगी आहे. तिच्याच शेजारी शबाना शेख ही तिच्या पतीसोबत राहत होती. तीन महिन्यांपूर्वीच शबाना ही तिथे भाड्याने राहण्यासाठी आली होती. तिच्याकडे सांभाळण्यासाठी दिलेल्या मुलाला घेऊन तिने पळ काढला. 

शबाना ही फैजानला घेऊन पळून गेल्याची पक्की खात्री होताच शकीलाने भायखळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला. दिवसाढवळ्या एका दोन महिन्यांच्या मुलाच्या अपहरणाच्या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत शबानाविरुद्ध गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरु केला होता. चौकशीत शबाना ही गरोदर असल्याने नियमित कामा हॉस्पिटलमध्ये जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शुक्रवारी शबाना ही फैजानसोबत कामा हॉस्पिटलमध्ये आली होती. यावेळी तिथे आधीपासून पाळत ठेवलेल्या भायखळा पोलिसांनी तिला शिताफीने अटक केली. तिच्याकडून पोलिसांनी फैजानची सुटका करुन त्याचा ताबा तिच्या आईकडे सोपविला आहे.