Fri, Apr 26, 2019 17:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेजार्‍याशी भांडण; तरुणाची आत्महत्या

शेजार्‍याशी भांडण; तरुणाची आत्महत्या

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 10 2018 1:03AMडोंबिवली : वार्ताहर

शॉक लागतो म्हणून मीटरची वायर काढण्यावरून शेजार्‍यांबरोबर वाद झाला. वादादरम्यान शेजार्‍यांनी एका तरुणासह त्याची बहीण व वडिलांनाही बेदम मारहाण केल्याने मानसिक तणावातून उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना डोंबिवलीत घडली आहे. विलास कांबळे(25) असे या मृत तरुणाचे नाव असून त्याला मारहाण व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी शेजार्‍यावर गुन्हा दाखल केला आहे.        

 डोंबिवली पूर्वेकडील आयरे रोडवरील साईनाथ झोपडपट्टीमध्ये इंदू कांबळे या राहतात. त्यांच्या घरातील मीटरच्या वायरमुळे शेजारच्या घरातील भिंतीला शॉक लागत असल्याचे सांगत मीनल वानखडे या महिलेने मीटरची वायर काढण्याचा प्रयत्न केला. यावरून या दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला. यावेळी संजय कांबळे, बाळू घाटोळे, बारकी घाटोळे, रवीना ऊर्फ जीजी घाटोळे, मीनल वानखेडे या पाच जणांनी इंदू यांच्यासह त्यांनी मुलगी कोमल, गौरी, मुलगा विलास व इंदू यांच्या पतीला घरात घुसून मारहाण केली. तसेच घरासमोर उभ्या असलेल्या मोटरसायकलचीही तोडफोड केली. 

आपल्या आई-वडिलांना झालेली मारहाण व बहिणीचे ओढणी ओढण्याबरोबरच ड्रेस फाडला गेल्याने मुलगा विलास (25) याला ते सहन झाले नाही. याच मानसिक तणावातून त्याने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. आपल्या मुलाला संजय कांबळे, बाळू घाटोळे, बारकी घाटोळे, रवीना उर्फ जीजी घाटोळे, मीनल वानखेडे या पाच जणांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत इंदू कांबळे यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत संजय कांबळे याला अटक केली आहे.