Sat, Nov 17, 2018 07:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पत्नीशी मोबाईलवर बोलताना अडथळा; शेजार्‍याची हत्या!

पत्नीशी मोबाईलवर बोलताना अडथळा; शेजार्‍याची हत्या!

Published On: May 24 2018 1:33AM | Last Updated: May 24 2018 1:28AMभिवंडी : वार्ताहर

पत्नीशी मोबाईलवर बोलत असताना शेजारी राहणार्‍या व्यक्तीने मोठमोठ्याने हाका मारून बोलण्यात अडथळा आणल्याच्या रागातून शेजार्‍याची डोक्यात लाकडी बॅटचा जोरदर फटका मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदरची घटना शहरातील नारपोली, कैलासनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. आशिषकुमार जैसवार (25) असे फरार आरोपीचे नाव आहे. तर संजय राठोड असे हत्या झालेल्या शेजार्‍याचे नांव आहे.

आरोपी आपल्या पत्नीशी मोबाईलवर बोलत असतानाच त्याचा शेजारी एका मुलाला हाका मारत होता. त्याचा अडथळा होत असल्याने आरोपीने संजय यास गप्प राहण्यास सांगितले, मात्र सांगूनही तो ऐकत नसल्याचे पाहून आशिषकुमारला संजयचा आरडाओरडीचा राग आला. त्याने रागाच्या भरात लाकडी बॅटने संजयला मारहाण करीत असतानाच बॅटचा जोरदार फटका संजयच्या डोक्यात बसला. यामुळे संजय रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. 

संजयला जखमी अवस्थेत उपचारासाठी स्व. इंदिरा गांधी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र संजयची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या गुन्ह्याचा अधिक तपास एपीआय विष्णू अव्हाड करीत आहे.