Thu, Jun 20, 2019 21:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोट्यवधी रुपये खर्चून मिठीचे पाणी अशुद्धच!

कोट्यवधी रुपये खर्चून मिठीचे पाणी अशुद्धच!

Published On: Mar 01 2018 1:56AM | Last Updated: Mar 01 2018 1:52AMमुंबई : प्रतिनिधी 

मिठी नदीच्या विकासावर करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. पण मिठीच्या पाण्याच्या शुध्दीकरणाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मिठीचे पाणी अशुध्द करणार्‍या आरएमसी प्लॅन्ट बंद करण्याची मागणी बुधवारी भाजपाने स्थायी समितीत लावून धरली. अखेर याबाबत चौकशी करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

पावसाळ्यापुर्वी मिठी नदीसह नालेसफाई करण्याचे प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी मिठी नदीतील पाण्याच्या निकृष्ठ दर्जाकडे स्थायी समितीचे लक्ष वेधले. मिठी नदीच्या पात्रात आरएमसी या सिमेंट मिक्स करणार्‍या प्लॅन्टचे सपेद रंगाचे अशुध्द पाणी मिठीमध्ये सोडले जाते. त्याशिवाय अन्य छोट्या कारखान्याचे सांडपाणी मिठी नदीतच सोडले जात असल्यामुळे मिठी नदीचे पाणी अशुध्द झाल्याचे कोटक यांनी यांनी सांगितले. तर, शिवसेनेच्या मिलिंद वैद्य यांनी मिठी नदी व नाल्यातील गाळ उपसण्यासाठी दगड-माती टाकून रॅम्प बनवण्यात येतो. पण गाळ काढल्यानंतर कंत्राटदार हा रॅम्प तसाच ठेवत असल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा जलद होत नाही. त्यामुळे कंत्राटदारांच्या कामाकडे पालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणीही वैद्य यांनी केली. 

मिठी नदी असो अथवा नाले यातील 100 टक्के गाळ कधीच काढला जात नाही. त्यामुळे पहिल्या पावसात मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबते. पालिका प्रशासन मात्र  100 टक्के गाळ काढल्याचा नेहमीच दावा करते, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. नालेसफाईतील भेष्टाचारामुळे पालिकेकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. त्यामुळे नालेसफाईत काही घोटाळा होत नाही ना, याकडे प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष द्यायला हेव, असे मत स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी व्यक्त केले. अखेर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी मिठी नदीच्या पात्रात सोडण्यात आलेल्या आरएमसी प्लॅटची तपासणी करून, त्याचा अहवाल स्थायी समितीला सादर करण्यात येईल. जर आरएमसी प्लॅटमुळे पाणी अशुध्द होत असेल तर, हे प्लॅन्ट बंद करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे मुखर्जी यांनी यावेळी स्पष्ट केले.