Wed, Jul 17, 2019 20:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नीरव मोदी, चोक्सीविरुद्ध अटक वॉरंट

नीरव मोदी, चोक्सीविरुद्ध अटक वॉरंट

Published On: Apr 09 2018 1:50AM | Last Updated: Apr 08 2018 8:58PMमुंबई : वृत्तसंस्था

पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) 13 हजार कोटी रुपयांचा गंडा घालणार्‍या नीरव मोदी आणि त्याचा   काका मेहूल चोक्सी यांच्याविरोधात मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. हे दोघेही सध्या विदेशात फरार असून चौकशीसाठी अनेकवेळा समन्स बजावूनही ते हजर राहिलेले नाहीत. 

या दोघांच्या अधिकृत ई-मेलवर सीबीआयने अनेकवेळा चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीसही बजावली होती; पण अनेक कारणे देत त्यांनी भारतात येण्याचे टाळले आहे. अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याबरोबरच आता मोदी आणि चोक्सीविरुद्ध ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी करण्याचा मार्गही खुला झाला आहे. नीरव मोदी सध्या हाँगकाँगमध्ये असल्याची माहिती सरकारकडे असून त्याच्या अटकेसाठी या देशाला विनंती करण्यात आली आहे. 

दरम्यान, सीबीआयने विदेशातील भारतीय बँकांच्या शाखेतील अधिकार्‍यांचीही याप्रकरणी चौकशी केली आहे. पीएनबीच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेने जारी केलेल्या बोगस लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या (एलओयू) बळावर विदेशातील भारतीय बँकांनी नीरव मोदीच्या कंपन्यांना कर्जे दिली आहेत. हाँगकाँग येथील अलाहाबाद बँकेच्या शाखेत विदेशी चलन विनिमय व्यवहार सांभाळणार्‍या अधिकार्‍यांनाही सीबीआयने समन्स बजावले आहे. 

पीएनबीचा घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी नीरव मोदीने भारतातून पलायन केले होते. नीरवसह त्याची पत्नी, भाऊ आणि मेहूल चोक्सीविरुद्ध सीबीआय आणि सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) अनेक गुन्हे दाखल केले आहेत. नीरव मोदीच्या कंपनीशी संंबंधित तसेच अनेक बँक अधिकार्‍यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सीबीआयने नीरव मोदीला पकडण्यासाठी इंटरपोलची मदतही घेतली आहे.

Tags : Neerav Modi, Choksi, Arrest warrant,