Thu, Aug 22, 2019 14:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'प्रज्ञा सिंहचे वक्तव्य; कृतघ्नतेचा कळस'

'प्रज्ञा सिंहचे वक्तव्य; कृतघ्नतेचा कळस'

Published On: Apr 20 2019 9:18AM | Last Updated: Apr 20 2019 12:25PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी राहिलेल्या तथाकथित साध्वी आणि भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी अत्यंत हीन पातळीवर जाऊन अकलेचे तारे तोडले. 'अशोकचक्र' सन्मानित शहीद करकरे 'माझ्या शापाने मेले' असे वक्तव्य त्यांनी केल्याने भाजपला नव्या वादाला तोंड द्यावे लागत आहे. भाजपने पत्रक प्रसिद्ध करुन साध्वी प्रज्ञा यांच्या विधानाशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले असले तरी विरोधी पक्षाने भाजपाला चांगलेच घेरले आहे. 

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता वादग्रस्त वक्तव्य केलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. असंवेदनशीलता आणि कृतघ्नतेचा कळस असणारे विधान करणाऱ्या उमेदवारावर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काय कारवाई करणार आहेत? असा सवाल  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे. 

साध्वी यांनी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याचा पार्श्वभूमीवर ट्विट करत सुळे यांनी मुंबईच नव्हे तर देशातील प्रत्येकजण शहीद हेमंत करकरे यांच्यासारख्या शहीदांच्या बलिदानामुळे सुरक्षित आहे. शहीद हेमंत करकरे आणि सहकाऱ्यांचे २६/११ चे बलिदान आठवून आजही आमचा घास ओठी तसाच अडकतो. पण भाजपला फक्त जवानांच्या हौतात्म्याचे राजकारण करण्यात रस आहे का? असा सवाल करत सुळे यांनी शंका व्यक्त केली आहे.