Fri, Aug 23, 2019 14:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘नक्षल कनेक्शन’ चौकशी होताच संशयित शिक्षकाची आत्महत्या

‘नक्षल कनेक्शन’ चौकशी होताच संशयित शिक्षकाची आत्महत्या

Published On: Feb 01 2018 1:36AM | Last Updated: Feb 01 2018 1:24AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

भीमा-कोरेगाव दंगलीशी संबंध असल्याच्या आरोपावरून अलिकडेच मुंबईमध्ये सात सीपीआय (माओवादी) संशयित कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत बाहेर आलेल्या माहितीनुसार एका शाळा शिक्षकाची दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) चौकशी केल्यानंतर संबंधीत शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रभाकर माछा असे या शिक्षकाचे नाव असू ही घटना 23 जानेवारी रोजी घडली. 

माछा हे वडाळा येथील तेलगू शाळेत गत 20 वर्षांपासून शिक्षक होते. त्यांच्या दुसर्‍या पत्नीचे नुकतेच निधन झाले होते. त्या दुःखात असतानाच त्यांच्या  सायन-मुंबई येथील घरी एटीएसने धडक देऊन त्यांची व त्यांच्या मुलाची रात्रभर चौकशी केली होती. शिवाय त्यांच्या निवासस्थानातून काही आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेतली होती. त्यामुळे ते अधिकच मानसिक दबावाखाली आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

23 जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता माछा यांचा मुलगा घराच्या मजल्यावरून खाली धावत आला  व त्याने त्याच्या वडिलांनी बेडरुममध्ये गळफास घेतल्याची माहिती देऊन एटीएसच्या अधिकार्‍यांना तत्काळ अ‍ॅम्ब्युलन्स बोलवण्याची विनंती केली. 

एटीएसने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अटक करण्यात आलेले संशयित हे माओवादी संघटनेमध्ये तरुणांच्या भरतीचे काम करीत होते. महाराष्ट्र व गुजरात हे त्यांचे कार्यक्षेत्र असून त्यांना औद्योगिक क्षेत्रात माओवाद विचारसरणी रुजवायची असल्याचे म्हटले आहे. माओवाद्यांच्या गोल्डन कॉरिडॉर या संकल्पनेच्या प्रसारामध्ये यांचा मोठा भाग असल्याचेही सांगण्यात येते. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून आक्षेपार्ह माओवादी सीडी व साहित्य जप्त करण्यात आले आहे.सात संशयित माओवाद्यांपैकी अजय उर्फ महेश लिंग्या वेनुगोपालन याने प्रभाकर माछा यांची माहिती दिल्यानंतरच एटीएसने त्यांची चौकशी केल्याचे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. वेणूगोपालन यांच्या चौकशीनंतरच उर्वरित संशयित माओवाद्यांना ताब्यात घेण्यात आले होते व माछा यांची फक्त चौकशी करून सोडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. संशयित माओवाद्यांच्या कुटुंबियांनी ते सर्व जण निष्पाप असून त्यांचा सीपीआय (माओवादी) विचारसरणीशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे.

प्रभाकर माछा हे त्यांच्या पत्नीच्या निधनाने काही 

दिवसांपासून तणावाखाली होते. त्यातच एटीएस पथकाने काही दिवस त्यांची चौकशी चालवल्याने ते अधिकच तणावाखाली आले होते. त्यांच्या या चौकशीनेच त्यांच्यावरचा ताण वाढून त्यांनी या तणावाखालीच आत्महत्या केली आहे. माछा यांचे कुटुंब काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे मृत्यूनंतरचे विधी करून तेलंगणातून परतले होते.  
- एस. यादगिरी, 
सेक्रेटरी, एम-2 बिल्डींग, प्रतिक्षानगर, सायन

भीमा - कोरेगाव दंगलीशी संबंध?  

अटक करण्यात आलेल्या सातही संशयित माओवाद्यांना त्यांचा भीमा-कोरेगाव दंगलीशी काय संबंध आहे, 31 डिसेंबर 2017 ते 2 जानेवारी 2018 या काळात ते कोठे होते, काय करीत होते आदी बाबींची एटीएसने चौकशी केली. परंतु एटीएसने त्यांच्यावर नोंदवलेल्या एफआरआयमध्ये भीमा-कोरेगाव प्रकरणाशी यांचा संबंध काय आहे याबाबत काहीही नमूद केले नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. शिवाय त्यांचा असा कोणत्याही दंगलीशी संबंध नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे.