Fri, May 24, 2019 06:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्याच्या बंदमध्ये नवी मुंबई नाही

उद्याच्या बंदमध्ये नवी मुंबई नाही

Published On: Aug 08 2018 2:05AM | Last Updated: Aug 08 2018 1:52AMनवी मुंबई : प्रतिनिधी

25 जुलै रोजी झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनात दोन समाजात निर्माण झालेली तेढ लक्षात घेऊन 9 ऑगस्ट रोजी होणार्‍या मराठा समाजाच्या राज्यव्यापी आंदोलनात नवी मुंबई सहभागी होणार नसून त्या दिवशी नवी मुंबई सुरू राहणार असल्याची माहिती सकल मराठा समितीचे समन्वयक व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले. मात्र त्यादिवशी एपीएमसीचे घाऊक पाचही बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतल्याची माहिती घाऊक व्यापारी संजय पानसरे यांनी पुढारीशी बोलताना दिली.

25 जुलै रोजी व्यापारी बंदमध्ये सामील झाले नव्हते. यामुळे पाचही मार्केटच्या व्यापार्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्याचा परिणाम बाजारावर झाला. आता तीच वेळ  येऊ नये आणि शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये म्हणून सोमवारीच शेतकर्‍यांना 9 ऑगस्टला शेतमाल पाठवू नका असे फोन केले. त्यामुळे बाजारात शेतमाल येणार नसल्याने पाचही मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय संघटनांनी घेतला. याची माहिती व्यापार्‍यांनी पोलिसांना दिली आहे. 

नवी मुंबई पोलिसांनी दोन दिवसापूर्वी कोपरखैरणेत स्थानिकांची बैठक घेतली. शिवाय आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर फौजदारी कलम 149 नुसार आंदोलनकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मराठा समाजाच्या नावाखाली हिंसाचार करणार्‍या आंदोलकांवर नजर ठेवण्याचे काम आम्ही करणार असून जे सापडतील त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येईल असेही यावेळी पाटील यांनी सांगितले.

25 जुलै रोजी झालेल्या आंदोलनात समाजकंटकांनी आक्रमक होत पोलीस चौकीसह सात वाहने जाळून 150 हून अधिक वाहनांची मोडतोड केली. एका तरुणाला जीव गमवावा लागला होता. या विरोधात आगरी -कोळी समाज संतापला. 9 ऑगस्ट रोजी पुन्हा आंदोलन झाले आणि त्यात आमचे नुकसान झाले तर आम्हीही गप्प बसणार नाही असा इशारा देत यापुढे मराठा समाजाला आंदोलनाची परवानगीच देऊ नका, अशी कणखर भूमिका आगरी-कोळी समाजाने घेतली आहे. त्यामुळे 9 ऑगस्टला नवी मुंबईत कुठेही बंद राहणार नाही. निदर्शनेही होणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले. या निर्णयासाठी मंगळवारी सकाळी माथाडी भवन येथे शहरातील मराठा समाजच्या सदस्यांची बैठक आयोजित केली होती.या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. नुकत्याच झालेल्या आंदोलनात अनेकांवर गुन्हे दाखल झाले असून त्यांच्यावरील गुन्हे अद्याप मागे घेतले नसल्याने  आंदोलनकर्ते अडचणीत आले आहेत. 25 जुलै रोजी झालेल्या आंदोलनात नदीकाठी असलेले दगड व मुरुमांच्या दगडांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता.अखेर हे दगड आले कोठून याचाही पोलीस शोध घेत असल्याचे पाटील यांनी सांगितले.