Tue, Nov 20, 2018 21:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवीमुंबईतील पोलिसाची महिला पोलिसाला मारहाण

नवीमुंबईतील पोलिसाची महिला पोलिसाला मारहाण

Published On: Apr 19 2018 1:35AM | Last Updated: Apr 19 2018 1:10AMठाणे : वार्ताहर 

नवी मुंबई येथून ठाणे न्यायालयात सुनावणीसाठी कैद्यांना घेवून आलेल्या  पोलीस शिपायाने सहकारी महिला पोलीस कार्मचारीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना 17 एप्रिल रोजी दुपारी ठाणे न्यायालयाच्या गेटसमोर घडली. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात किरण कांबळे या नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप त्याला अटक केलेली नाही. 

दरम्यान, यापूर्वीही महिला पोलिसांशी गैरवर्तणूक केल्याचे अनेक प्रकार ठाणे पोलीस आयुक्तालयात घडले असतानाही आरोपी पोलीस मोकाट असल्याने संताप व्यक्त होत आहे. गुन्ह्यातील एका आरोपीला घेऊन नवी मुंबई पोलीस दलाचे पथक मंगळवारी ठाणे सत्र न्यायालयात आले होते. तेव्हा वाहनात बेड्या घालून बसवलेल्या आरोपीने पिण्यासाठी पाणी मागितल्याने आरोपीच्या हातातील बेडी सैल करून पाणी देण्याची विनंती महिला पोलीस शिपाईने सोबत असलेल्या सहकारी पोलीस शिपाई किरण कांबळे यांना केली. याचाच राग आल्याने शिपाई कांबळे यांनी महिला पोलीसाला अश्‍लील शिवीगाळ करून मारहाण करीत वाहनातून खाली खेचले. 

तसेच महिला शिपाईच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा तर्‍हेने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. घडलेल्या या प्रकारची माहिती पीडित महिला शिपायाने आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्यानंतर याप्रकरणी,ठाणे नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान,एका पोलिसानेच सहकारी महिला पोलिसाला अश्‍लील शिवीगाळ व मारहाण केली असतानाही ठाणे नगर पोलीस तपासाच्या नावाखाली दिरंगाई करीत असून अद्याप कांबळे यांना अटकदेखील केलेली नाही. यासंदर्भात, वरिष्ठ माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.