होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘स्वच्छ नवी मुंबई’ची पालिका आयुक्तांकडून पाहणी

‘स्वच्छ नवी मुंबई’ची पालिका आयुक्तांकडून पाहणी

Published On: Jan 06 2018 1:25AM | Last Updated: Jan 06 2018 12:46AM

बुकमार्क करा
नवी मुंबई : प्रतिनिधी 

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्व्हेक्षण 2018 च्या अनुषंगाने शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात असून शुक्रवारी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. स्वत: सकाळी विभागवार फिरून स्वच्छताविषयक कामांचा आढावा घेतला.  यावेळी आठ रेल्वे स्थानक परिसराला त्यांनी भेट दिली.

यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व  रमेश चव्हाण, शहर अभियंता मोहन डगांवकर यांच्यासह  पालिका अधिकारी उपस्थित होते. पाहणी दौर्‍यात त्यांनी वाशी रेल्वे स्टेशन बाहेरील परिसराला भेट देऊन तेथील भिंतींवरील स्वच्छता विषयक संदेश लिहिलेल्या भित्तीचित्रांची पाहणी केली. याशिवाय सिडकोमार्फत प्लॅटफॉर्मवर ओला व सुका कचरा टाकण्यासाठी बसवण्यात आलेल्या छोट्या कचरापेट्या तसेच रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंची पाहणी केली. वाशी रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म संपल्यानंतर लोक एका कोपर्‍यात लघुशंका करण्यासाठी जातात हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी मुतारी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. 

मागील पाहणी दौर्‍यात आयुक्तांनी सूचित केल्याप्रमाणे रघुलीला मॉल आणि सानपाडा या दोन्ही बाजूंनी रेल्वे स्टेशनमध्ये जाण्यासाठी लोक शॉर्टकट मार्ग वापरायचे ते मार्ग बंद करण्यात येऊन त्याठिकाणी भिंतींवर स्वच्छतेचे संदेश रंगवून तो परिसर सुशोभित करण्यात आलेला आहे. स्टेशनमधील प्रसाधनगृहांनाही आयुक्तांनी भेटी देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी केली. तसेच प्रामुख्याने दिव्यांग व्यक्तींना ते वापरासाठी सुलभ आहेत काय याचा बारकाईने आढावा घेतला. वाशी विभागात सायन -पनवेल महामार्गानजीक सेंटर वन मॉलजवळ बसथांबा असून तेथे प्रवासी थांबत असल्याने तेथे बसवण्यात आलेल्या नवीन शौचालयाची त्यांनी पाहणी केली. वाशी बसडेपोमधील स्वच्छतागृहे तसेच डहश टॉयलेटचीही त्यांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे बस डेपोत असलेली पाणपोई सुरु करण्याची सूचना एनएमएमटी प्रशासनाला दिली. या दौर्‍यात सेक्टर 17 वाशी येथील मार्केटमधील कंपोस्ट पिट्सची पाहणी करून तेथे स्वतंत्र प्रवेशव्दार करण्याचे निर्देश दिले.

बेलापूर विभागात रेल्वेस्टेशन प्रमाणेच आयुक्तांनी सेक्टर 11 व 15 येथील वाणिज्य भागाला भेट देऊन आवश्यक तेथे पदपथ दुरुस्तीच्या सूचना दिल्या. सेक्टर 11 येथील किऑस परिसराची पाहणी करून त्यांनी त्याठिकाणी व्यवस्थित स्वच्छता राखण्याच्या सूचना तेथील व्यवसायिकांना दिल्या. सेक्टर 15 मधील एकत्रित विकास कामांची पाहणी करून त्यांनी पदपथाच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत सुशोभिकरण करण्याच्या सूचना दिल्या.