Fri, Jul 19, 2019 15:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई विमानतळ 2019 मध्ये अंशतः सुरू

नवी मुंबई विमानतळ 2019 मध्ये अंशतः सुरू

Published On: Sep 13 2018 2:14AM | Last Updated: Sep 13 2018 2:03AMनवी मुंबई : प्रतिनिधी

आधुनिक साधन-सामुग्रीने सज्ज होत असलेल्या नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतीपथावर असून 2019 पर्यंत विमानतळ अंशतः सुरू करण्याचे संकेत सिडकोने दिले आहेत. मात्र, याबाबत विमानतळ प्राधिकरण व सिडको यांच्यामध्ये मतभेद असून सिडकोला येथून विमानाचं उड्डाण 2019 पर्यंत करायचं असलं तरी इतक्यात हे शक्य नसल्याचे विमान प्राधिकरणाचे मत आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2019 पर्यंत विमान उड्डाण करेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानुसार सिडकोला येथून 2019 पर्यंत विमानोड्डाण व्हावे असे वाटते. मात्र, तेथील कामाची गती व अडचणी पाहता इतक्यात ते शक्य नसल्याचे विमानतळ प्राधिकरणाला वाटते. 

2019 पर्यंत हा विमानतळ अंशतः सुरू होणार असला तरी विमानात थेट इंधन भरण्यासाठी इंधन डेपो, मालवाहतूक टर्मिनल, प्लाईट किचन व हवाई रहदारी नियंत्रण टॉवर यांचे काम नंतर होणार आहे. इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्याशी झालेल्या संयुक्त करारानुसार येथे इंधन डेपोचे काम उशिरा होणार असले तरी तोपर्यंत टँकरच्या माध्यमातून तेलपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विमानतळाच्या बांधणीमध्ये सिडकोचे 26 टक्के समभाग आहेत. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानुसार सिडकोचा 2019 अखेरपर्यंत निदान इथं  विमानाची चाचणी करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता विमान प्राधिकरणाच्या नियोजनानुसार या विमानतळाच्या फेज 1 चे काम 2021 पर्यंत पूर्ण होऊन विमानतळ सुरू होईल, असा विमान वाहतूक मंत्रालयाचा होरा आहे. 

विमानतळ कामकाजाच्या प्रगतीबाबत 31 ऑगस्ट रोजी मुख्य सचिव, विमान वाहतूक सचिव, सिडकोचे अधिकारी, मुंबई विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यामध्ये बैठक झाली. मात्र, त्यानंतर सिडकोने विमानतळ अंशतः सुरू करण्याबाबत पत्रक काढले होते. हे पत्रक काढण्यापूर्वी त्यांनी अन्य विभागांशी चर्चा केली नसल्याचेही समजते. 

विमानतळ प्राधिकरणाच्या नियोजनानुसार विमानतळाच्या फेज 1 चे काम 41 महिन्यांत म्हणजे 2021 पर्यंत पूर्ण होईल. परंतु, सिडकोच्या म्हणण्यानुसार फेज 1 चे काम 2019 अखेर अंशतः पूर्ण होऊन विमान चाचणी घेण्यात येईल.