Sun, Aug 18, 2019 20:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाट्यसंमेलन भाजपचे, परिषदेचे की भद्रकालीचे

नाट्यसंमेलन भाजपचे, परिषदेचे की भद्रकालीचे

Published On: Jun 13 2018 1:49AM | Last Updated: Jun 13 2018 1:22AMठाणे : प्रतिनिधीे

मी नाराज नाही, माझं वय 78 आहे,  माझी तब्येतही ठणठणीत आहे. पण मी संमेलनाला जाणार नाही. मी कुणावर नाराज होणार असा सवाल करत मला कुठलीही अपेक्षा नाही, पण आता मुलुंडमध्ये होणार्‍या नाट्यसंमेलनात महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री पुढाकार घेऊन लक्ष घालत आहेत. याआधी आमच्या कार्यकारिणीने आयोजित केलेल्या संमेलनाला तावडे फिरकलेही नाहीत. या संमेलनाच्या आयोजनातील एकाधिकारशाही पाहून हे संमेलन भाजपचे, नाट्य परिषदेचे की  भद्रकालीचे, असा सवाल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोषाध्यक्षा व निर्मात्या लता नार्वेकर यांनी केला. 

नाट्यसंमेलनाच्या निमंत्रणावरून, पत्रिकेतील नावांवरून नाट्यवर्तुळात सध्या विविध चर्चा सुरू आहेत. याबाबत नाट्य परिषदेच्या माजी कोषाध्यक्षा यांच्या मनोगताचे पत्र समाजमाध्यमातून फिरते आहे. त्याबाबत नार्वेकर यांच्या संवाद साधला असता, त्या म्हणाल्या, आमच्या कार्यकारिणीच्या काळात 4 नाट्यसंमेलने झाली. त्यातल्या एकाही संमेलनाला विनोद तावडे यांनी हजेरी लावली नाही. ठाण्यात झालेल्या नाट्यसंमेलनाला त्यांनी थोडा वेळ हजेरी लावली, आता या संमेलनात तावडे ज्या हिरिरीने संमेलनात येतात, लक्ष घालत आहेत, ते पाहता निवडणुका आल्या म्हणून तावडे हे करत आहेत का, असा सवाल त्यांनी केला.      

नाट्यसंमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेच्या वादावरही त्या म्हणाल्या, नाट्यसंमेलनाच्या पत्रिकेचा गोंधळ पण तसाच. शरद पोंक्षे सचिव आहेत, त्यांचे नाव पत्रिकेत आहे का, त्यानंतर कोषाध्यक्षांचे नाव नाही, नाट्यसंमेलन नेमके कुणाचे आहे, नाट्यसंमेलन भद्रकाली प्रॉडक्शनचे आहे, भाजपचे आहे, की नाट्य परिषदेचे आहे, असा प्रश्‍न माझ्यासारख्या बाईला पडतो. मी भावनेवर चालणारी बाई नाही. मी स्वतंत्र विचारांची  बाई आहे,  संमेलनाला जाण्याचा निर्णय हा माझ्यापुरता निर्णय आहे. मी संमेलनाची वारकरी नाही, मला आमंत्रण नाही, या विषयी माझी आजिबात तक्रार नाही.