Tue, Mar 19, 2019 16:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत उभे राहणार नाट्यसंग्रहालय!

मुंबईत उभे राहणार नाट्यसंग्रहालय!

Published On: Mar 11 2018 1:52AM | Last Updated: Mar 11 2018 1:18AMमुंबई : राजेश सावंत

मानापमान, कट्यार काळजात घुसली, जय जय गौरीशंकर, शकुंतला, सीता स्वयंवर आदी संगीत नाटकांनी एकेकाळी मराठी नाट्यसृष्टी गाजवली होती. पण संगीत नाटकांचा पडदा कायमचा बंद झाला आहे. त्यामुळे अशा नाटकांची परंपरा अलिकडच्या पिढीला समजावी, यासाठी मुंबईत नाट्य संग्रहालय उभारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

दीनानाथ मंगेशकर, बाल गंधर्व, कान्होपात्रा, रामदास कामत, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, जयमाला शिलेदार यांच्यासारख्या गायक व नाट्य कलावंतांनी संगीत मराठी नाटकांना उच्च स्थानावर नेऊन ठेवले होते. झाले युवती म्हणा.. घेई छंद मकरंद.. देह देवाचे मंदिर..जय जय रमारमण श्रीरंग.. नारायणा रमा रमणा.. आदी नाट्य संगीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. पाच दशकांपूर्वी विलेपार्ले येथील मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहासह शिवाजी मंदिर येथे संगीत नाटके हाऊसफुल्ल चालत होती. मानापमान, स्वयंवर, सौभद्र, मत्स्यगंधा, जय जय गौरीशंकर नाटकांनी इतिहास रचला होता. अलिकडच्या काळात ठरावीक नाटकांचे नवोदित कलाकारांकडून प्रयोग केले जातात.

नाट्यसृष्टीत गेल्या दोन दशकांत भरत जाधव, प्रशांत दामले, मच्छिंद्र कांबळी यांची व्यावसायिक नाटके रसिकांनी उचलून धरली. यात वस्त्रहरण, पांडगो ईलो रे ईलो, सही रे सही या नाटकांचा समावेश आहे. पण गेल्या काही वर्षात नाटकांपेक्षा चित्रपटांकडे रसिकांचा ओढा असल्यामुळे नाटकांना उतरती कळा लागली आहे. त्यामुळे नाट्य संस्कृती जोपासण्यासाठी नाट्य संग्रहालयाच्या दिशेने पडलेले हे पाऊल महत्त्वाचे समजले जाते. नाट्यकलेचे जतन करण्यात मुंबईत नाट्यसंग्रहालय उभारण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. विशेष म्हणजे यासाठी पालिका अर्थसंकल्पात 10 लाख रुपयांची आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे.