Thu, Aug 22, 2019 12:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नटवर्य जयवंत नाडकर्णी यांचे निधन

नटवर्य जयवंत नाडकर्णी यांचे निधन

Published On: Aug 14 2018 2:03AM | Last Updated: Aug 14 2018 2:03AMमुंबई : प्रतिनिधी

ज्येष्ठ नटवर्य जयवंत नाडकर्णी यांचे वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईत निधन झाले.  आजारी असलेल्या नाडकर्णी यांची सोमवारी प्राणज्योत मालवली.नाडकर्णी यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.

नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक यांचे पट्टशिष्य असलेल्या नाडकर्णी यांनी  नानासाहेबांसोबतच हॅम्लेट आणि इतर व्यावसायिक नाटकांत महत्वाच्या भूमिका केल्या. ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या रंगायनने स्थापनेपासून सादर केलेल्या प्रत्येक नाटकात नाडकर्णी होतेच. शितू, दूरचे दिवे, वैजयंती, कौतेय, एकशून्य बाजीराव, करायला गेलो एक, मी जिकलो मी हरलो, वर्तुळाचे दुसरे टोक, माता द्रौपदी, द्वंबद्विपचा मुकाबला, वेड्याचे घर उन्हात, पाषाण पालवी अशा नाट्यकृतीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. नाडकर्णी यांनी अरुण काकडे, माधव वाटवे, विमल जोशी, लालन सारंग, कमलाकर सारंग, कमलाकर नाडकर्णी, दामु केंकरे, चित्तरंजन कोल्हटकर, भक्ती बर्वे, कुमुद चास्कर, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, उषा नाडकर्णी, स्नेहलता प्रधान अशा ज्येष्ट कलाकारांसोबत अनेक प्रायोगिक, तसेच व्यावसायिक नाट्यकृती सादर केल्या.

राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाची अनेक सुवर्ण पदके जयंत नाडकर्णी यांना मिळाली आहेत. तसेच त्यांना मुंबई महानगर पालिकेतून 1984 या वर्षी निवृत्त होईपर्यंत खात्यांतर्गत, आंतरविभागीय नाट्यस्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनयाचे, दिग्दर्शनाचे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.