Sun, Jul 05, 2020 14:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सत्ता स्थापनेबाबत 'आमचं अजून ठरलंच नाही', शरद पवारांची गुगली

सत्ता स्थापनेबाबत 'आमचं अजून ठरलंच नाही', शरद पवारांची गुगली

Last Updated: Nov 19 2019 1:29AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची आज (ता. १८) दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत पाऊणतासहून अधिकवेळ चर्चा झाली. बैठकीनंतर शरद पवार त्यांच्या ६ जनपथ निवासस्थानी पोहोचले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आघाडीतल्या मित्रपक्षांना नाराज करू शकत नाही. महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवणार असून शिवसेनेसोबतच्या महाआघाडीबाबत अजून आमचं काही ठरलं नसल्याचे पवार यांनी सांगितले.

 ते म्हणाले की, सोनिया गांधी काँग्रेसच्या अन्य नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. त्यांच्यासोबतच्या भेटीत महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. सत्ता स्थापनेबाबत आघाडीसोबत असणाऱ्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, समाजवादी पक्ष यांना विश्वासात घ्यावे लागणार आहे. 

सोनिया गांधी यांना राज्यातील राजकीय स्थितीबाबत कल्पना दिली आहे. एकसूत्री कार्यक्रमाबाबत कोणतीही चर्चा नाहीसत्तास्थापनेचं काय करायचं ते भाजपा आणि शिवसेना पाहून घेतील, असे म्हणत बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झालीच नसल्याचं पवार यांनी सांगितलं. पवारांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. 

तत्पूर्वी, सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी आज शरद पवार दिल्लीत दाखल झाले. या भेटीनंतर मंगळवारी (ता.१९) पुन्हा राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होऊन सत्तास्थापनेबाबत निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यात रविवारी (ता.१७) शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.

काल पुण्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक झाली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. धनंजय मुंडे, पक्षाचे गटनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ आदी उपस्थित होते. दरम्यान, कोअर कमिटीच्या बैठकीनंतर शरद पवार मुंबईला गेले, तेथून ते दिल्‍लीला रवाना झाले.