Fri, Jul 19, 2019 20:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अच्छे दिन राहुद्या, बुरे दिन परत द्या : शरद पवार

अच्छे दिन राहुद्या, बुरे दिन परत द्या : शरद पवार

Published On: Mar 01 2018 1:52AM | Last Updated: Mar 01 2018 1:52AMमुंबई :  प्रतिनिधी 

राज्य व केंद्र सरकार मोठमोठ्या घोषणा करून सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे. अच्छे दिन येणार म्हणणाऱ्या सरकारच्या आश्वासनांना शेतकरी कंटाळले आहेत. तुमचे अच्छे दिन राहुदे आम्हाला आमचे बुरे, वाईट कसले असतील ते दिन परत द्या, असे म्हणत शरद पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

सरकारच्या धोरणांमुळे सामान्य व्यक्ती उध्द्वस्त होत असून बँका धोक्यात आल्या आहेत, या सरकारला परत पाठवून परिवर्तन करण्याची वेळ आली आहे, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. आझाद मैदानात बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादीने शक्तीप्रदर्शन केले. 

पवार म्हणाले, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना महिन्याभराच्या सर्व खर्चासाठी केवळ 900 रूपये दिले जातात. रेशनवर गहू व तांदूळ देण्याऐवजी पशुखाद्य असलेला मका दिला जात आहे. नोटबंदीचा फटका सहकारी बँकांना व त्यामध्ये पैसे भरलेल्या नागरिकांना बसला आहे. मात्र आता आरबीआय आपली जबाबदारी झटकत आहे. नीरव मोदी प्रकरणामुळे लहान उद्योजकांकडे बँका संशयाने पाहू लागल्या आहेत. सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला जात आहे. नागरिक सरकारच्या अच्छे दिनांना कंटाळले असून जुने दिवस मागत असल्याचे पवार म्हणाले. राज्य सरकारकडून रिक्त पदे भरण्याऐवजी बेरोजगारी वाढवली जात आहे. महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ होत आहे. सरकार केवळ घोषणाबाजीमध्ये मश्गुल आहे, त्यांना परत पाठवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, सरकारकडून प्रचंड फसवणूक केली जात आहे. सेना भाजपची मिली भगत आहे. मराठी भाषेची गळचेपी झाल्याची नैतिक जबाबदारी शिवसेनेने घेतली नाही. एमयुटीपी प्रकल्प आम्ही सुरु केला तेव्हा आमची चेष्टा केली गेली. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगार अधिक अडचणीत आले आहेत. मंत्रालयाची सर्कस बनवण्याचे काम सरकारने केले आहे. सरकारला ऑफलाईन करण्याचा निर्धार त्यांनी केला.  

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल म्हणाले, सरकारच्या धोरणांमुळे सगळे धंदे चौपट झाले आहेत. मुंबइचे  आर्थिक क्षेत्रातील पहिले स्थान कायम आहे का हे तपासण्याची वेळ आली आहे.