मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्यातील आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस आणि समविचारी पक्षांशी चर्चा झाली असून सर्वांनी एकत्र निवडणुका लढवायचा निर्णय झाला आहे. मुंबईमध्ये एकत्र लढणार असल्यामुळे राष्ट्रवादीला जास्त जागा मिळतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. छगन भुजबळ हे तुरुंगातून बाहेर आल्याचा आनंद आहे. त्यांच्याबाबतीत अंतिम निर्णय होईल त्यावेळी माझ्यासह राज्यातील जनतेला खरा आनंद होईल, असेही पवार म्हणाले. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. पवार म्हणाले, मुंबईमध्ये निवडणूका जवळ आल्याने संघटनेला व्यवस्थित चेहरा द्यायचा आहे. मुंबई ही कामगारांची नगरी म्हणून ओळखली जायची. आता गिरणगाव राहिलेले नाही. वेगळ्या विचारांचा कामगार आज तेथे आला आहे. त्यांची संख्या व शक्ती वाढली असून त्यांच्याशी संपर्क वाढवून संघटन उभे केले पाहिजे.
मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात पदाधिकार्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप वळसे-पाटील यांच्यासमोर शुक्रवारी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुंबई अध्यक्ष निवड केली जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले. मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनीही गेल्या तीन वर्षात केलेल्या कामाची माहिती दिली.