Sat, Aug 24, 2019 19:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘शिवसेनेने नाटक करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडावे’

‘शिवसेनेने नाटक करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडावे’

Published On: Mar 21 2018 6:11PM | Last Updated: Mar 21 2018 6:11PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

अंगणवाडी सेविकांसाठी मेस्मा कायदा लागू करणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे  यांनी केली. यावर आज (२१ मार्च) राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधानपरिषदेत गदारोळ निर्माण केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून शिवसेनेला खडे बोल सुनावण्यात आले. ‘शिवसेनेने मेस्माला विरोध करण्याचे नाटक करण्यापेक्षा सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन सरकारमधून बाहेर पडावे’ असे ट्विट राष्ट्रवादीकडून करण्यात आले आहे. 

‘सेनेचे मंत्री व उद्धव ठाकरे यांच्यात समन्वय नाही किंवा कायदा पारित करून घ्यायचा व जनतेला मूर्ख बनवायचे, हे काम शिवसेनेच्या माध्यमातून सुरु आहे. शिवसेनेने हे नाटक करण्यापेक्षा सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन सरकारमधून बाहेर पडावे आणि अंगणवाडी सेविकांना आश्वस्त करावे’ अशा शब्दात शिवसेनेवर निशाणा साधण्यात आला आहे. 

अंगणवाडी सेविकांसाठी शिवसेनेची दुटप्पी भूमिका असल्याचेही या ट्विटमध्ये म्हणण्यात आले आहे. ‘अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावर शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. कायदा पारित होताना सेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात. कायद्याबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय होतो, तो अंमलात येतो त्यानंतर उद्धव ठाकरे वेगळा निर्णय घेतात’ असी टीकाही या ट्विटमधून करण्यात आली आहे. 

शिवसेना गप्प बसते अन् देखावा करते : अजित पवार 

अंगणवाडी सेविकांसाठी मेस्मा कायदा लागू केल्यानंतर विधानपरिषदेत या कायद्याच्या विरोधात गदारोळ  करण्यात आला. यामध्ये शिवसेनेच्या नेत्यांनीही या कायद्याला विरोध केला. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ‘शिवसेनेची दुटप्पी भूमिका यातही दिसून येते. बिल आणत असताना, निर्णय घेत असताना शिवसेना गप्प बसते. कॅबिनेटमध्ये तोंड उघडत नाही. मात्र सभागृहात आम्ही जनतेच्या बाजूने असल्याचा नुसता देखावा करते. आम्ही पूर्ण ताकदीनिशी अंगणवाडी सेविकांच्या पाठिशी आहोत, असे ट्विट त्यांनी केले आहे. 

अंगणवाडी सेविकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण केलेली नाही. आज काही निर्णय महिला व बालविकास मंत्र्यांनी जाहीर केले. पण हे करत असताना त्यांनी मेस्मा लावून त्यात खोच ठेवली. वास्तविक आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे आंदोलनापासून कुणालाही अडवता येत नाही. 

काय आहे महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा (मेस्मा)

महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल (मेस्मा) हा कायदा २००५ मध्ये अस्तित्वात आला. या कायद्याअंतर्गत अत्यावश्यक सेवांवर परिणाम करणा-यांवर कारवाई करता येते. मेस्माच्या यादीत सरकार कोणतेही क्षेत्राचा समावेश करू शकते. संपाला चिथावणी देणाऱ्यांना तसेच आर्थिक रसद पुरविणाऱ्या विरोधात या कायद्यातंर्गत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. 

Tags : NCP, Ajit Pawar, Supriya Sule, Dhananjay Munde, Sharad Pawar, Shivsena, Anganwadi Servent Issue, MESMA