Sat, Aug 24, 2019 22:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाशिक पालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे

नाशिक पालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे

Published On: Feb 08 2018 1:48AM | Last Updated: Feb 08 2018 1:47AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमटी)  अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची अखेर नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. पीएमटीला शिस्त लावण्यासाठी मुंढे यांनी कडक धोरण अवलंबिले होते. त्यामुळे त्यांना तेथेही विरोध झाला होता. 

राज्य सरकारने बुधवारी सहा सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या नव्या अध्यक्ष म्हणून नैना गुंडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंढे यांच्या बडग्यामुळे पीएमटीत काहीवेळा वादाचे प्रसंग निर्माण झाले होते. मुंढे यांनी नवी मुंबई महापालिकेत आयुक्त म्हणून काम करीत असताना आपल्या कडक स्वभावामुळे तेथील महापौर, आमदारांसह लोकप्रतिनिधींचा रोष ओढवून घेतला होता. त्याचा परिणाम म्हणून मुंढे यांना तेथून  हलविण्यात आले होते. 

आता नाशिक महापालिकेत त्यांची कारकीर्द कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक महापालिकेला शिस्त लावण्यासाठीच त्यांना तेथे पाठविण्यात आल्याची चर्चा मंत्रालयात आहे. नाशिक महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त अभिषेक क्रिष्णा यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली आहे.

महानंदच्या व्यवस्थापकीय संचालकपदी दीपककुमार मीना यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक के. व्ही. कुरुंदकर यांची मंत्रालयात पशुसंवर्धन विभागात सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ते येत्या सहा महिन्यांत सेवानिवृत्तही होत आहेत. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या उपसचिवपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.