Mon, Jun 17, 2019 03:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंगळवारी मोदी मुंबईत

मंगळवारी मोदी मुंबईत

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 24 2018 1:25AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

26 जून 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. काँग्रेसची ही दुखरी नस दाबून कोंडी करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. 26 जूनला आणीबाणीला 43 वर्ष पूर्ण होत असून या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आणीबाणीविरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व लोकशाही मूल्यांची चर्चा करण्यासाठी प्रदेश भाजपने खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली होती. या आणीबाणीला संघ परिवाराने कडाडून विरोध केला होता. जनसंघ, संघ परिवार आणि समाजवादी काँग्रेस विरोधात एकत्र आले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. ही आणीबाणी अजूनही काँग्रेसची दुखरी नस असल्याचे ओळखून भाजप काँग्रेसची कोंडी करण्याचे प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने आणीबाणीत कारावास भोगलेल्यांना पेन्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला काँग्रेसने विरोध केला आहे. मात्र मोदींच्या उपस्थितीत या योजनेचा प्रारंभ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात सकाळी 10.30 वाजता होणार्‍या या कार्यक्रमात लोकशाही मूल्यावर पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करतील तेव्हा ते काँग्रेसवर हल्लाबोल कारण्याची शक्यता आहे.