Fri, Sep 21, 2018 09:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नरेंद्र मोदी आज मुंबईत; काँग्रेसवर टीकास्त्र सोडणार?

नरेंद्र मोदी आज मुंबईत; काँग्रेसवर टीकास्त्र सोडणार?

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 26 2018 1:12AMमुंबई : प्रतिनिधी

26 जून रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. या घटनेला 43 वर्ष पूर्ण होत असून या दिवसाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काँग्रेसवर टीकास्त्र सोडण्याची शक्यता आहे. मोदींच्या उपस्थितीत भाजपने आणीबाणीविरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व लोकशाही मूल्यांची चर्चा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमात मोदी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 26 जून 1975 साली इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. या आणीबाणीविरोधात तेव्हाचा जनसंघ, संघ परिवार आणि समाजवाद्यांनी एकत्र येऊन काँग्रेसविरोधात लढा दिला होता.  त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचाही सामना करावा लागला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून हुकूमशाहीचे आरोप होत आहेत. तसेच त्यांच्या सत्ताकाळात लोकशाही धोक्यात असल्याची चर्चाही विरोधक करीत आहेत. या दिवसाचे औचित्य साधून नरेंद्र मोदी हे विरोधकांनी त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची शक्यता आहे. सकाळी साडेदहा वाजता मरिन लाईनजवळील बिर्ला मातोश्री सभागृहात हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाची मुंबई भाजपने जय्यत तयारी केली आहे.