Sat, Feb 16, 2019 14:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेना मला घाबरते, भाजपने विचार करावा : राणे

शिवसेना मला घाबरते, भाजपने विचार करावा : राणे

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 2:07AMमुंबई : प्रतिनिधी

शिवसेना मला घाबरते, त्यामुळे भाजपने आपल्याला सोबत घेऊ नये, यासाठी सरकारवर दबाव टाकण्याचे नाटक ते करतात. मी सत्तेबाहेर राहिलो काय आणि सत्तेत राहिलो काय, आपले कोणतेही नुकसान नाही. मात्र, कोण कुणाच्या फायद्याचा आणि तोट्याचा, याचा विचार भाजपने करावा, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे म्हणाले.

भाजपने नारायण राणे यांना सोबत घेऊ नये, यासाठी शिवसेनेचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सरकारला अटी घालून खरेतर ते स्वत:च अधिक नुकसान करून घेत आहेत. अशाप्रकारे विरोध करून ते माझे काहीही नुकसान करू शकणार नाहीत. मी सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे, माझी खेळी मी योग्य वेळी खेळेन, असे नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

स्वबळावर लढणार, असे उद्धव ठाकरे हे सांगत आहेत. मात्र, स्वबळावर लढल्यावर शिवसेना खरोखरच जिंकेल का, हा देखील त्यांच्यासमोर प्रश्‍न आहे. स्वबळावर लढण्याची घोषणा मात्र जोरात केली; पण लढून जिंकणार, या वाक्यात तेवढा जोर दिसला नाही. महाराष्ट्र स्वाभिमान  पक्षाची संघटनात्मक बांधणी सर्व जिल्ह्यांत सुरू असून लवकरच पक्षाचे काम राज्यात दिसेल, असे त्यांनी सांगितले. 

मंत्रालयासमोर आत्महत्या होणे हे महाराष्ट्राला भूषणावह नाही, या विषयाकडे सरकारने गांभीर्याने पाहावे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणार्‍या त्या उपमहापौरांच्या विरुद्ध सरकारने तत्काळ गुन्हा दाखल करावा, असे राणे म्हणाले.