Mon, May 20, 2019 10:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राणे जाणार राज्यसभेवर

राणे जाणार राज्यसभेवर

Published On: Mar 03 2018 1:58AM | Last Updated: Mar 03 2018 1:55AMमुंबई : उदय तानपाठक

शिवसेनेचा विरोध तसेच पक्षांतर्गत अडथळे यामुळे नारायण राणे यांना मंत्रिपदाची शपथ देऊ न शकलेल्या भाजपने आता त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दाखवली असून ही ऑफर राणे यांनी स्वीकारण्याचे ठरविले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीच ही ऑफर दिल्याचे समजते. आता राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या तीनपैकी एक जागा राणे यांना दिली जाईल. महाराष्ट्र स्वाभिमान या आपल्या पक्षाकडून राणे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. सध्याचे विधानसभेतील संख्याबळ पाहता राणेंसह भाजपच्या तीनही जागा बिनविरोध येतील. याबाबत भाजपच्या केंद्रीय समितीची शनिवारी नवी दिल्लीत बैठक होणार आहे.

राणे यांनी बुधवारी रात्री दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यासोबत होते. राज्यात मंत्रिपद देण्यासंदर्भात राणे यांनी यावेळी विचारणा केली असता, त्यात काही अडचणी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्या अडचणी लवकरच दूर होतील. राणे यांना मंत्रिमंडळात घेण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध असून तसे झाल्यास सेना मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सध्याची राज्यातील राजकीय स्थिती लक्षात घेता सर्व विरोधक भाजपविरोधात एकत्र येतील आणि सरकारच धोक्यात येऊ शकते, याची कल्पना मुख्यमंत्र्यांनी अमित शहा आणि राणे यांच्यासमोरच दिल्याचे समजते. त्यामुळे मंत्रिपदाऐवजी राज्यसभेवर येण्याचा सल्ला शहा यांनी राणे यांना दिल्याचे समजते. राणे यांनी त्यास मान्यता दिली असून येत्या काही दिवसांतच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान या पक्षाचे अस्तित्व कायम ठेवूनच ही ऑफर स्वीकारण्याचे राणे यांनी मान्य केल्याचे समजते.

आपला पक्ष भाजपसोबतच असला, तरी आमच्या काही अटी आणि ध्येयधोरणे आहेत. अमित शहा यांच्याशी आपले याबद्दल बोलणे झाले. त्यांनी खासदारकीची ऑफर दिली आहे. त्यावर मी विचार करून निर्णय घेईन, तसे मी भाजपाध्यक्षांनाही सांगितले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविण्याबाबत अजून विचार केलेला नाही. मात्र, निवडणुकांच्या सहा महिने आधी याबद्दल विचार करून निर्णय घेऊ, सध्या तरी त्यांची खासदारकीची ऑफर आहे. त्यानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी माहिती राणे यांनी दिली.महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी भाजपकडून प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान आणि नारायण राणे या तिघांची नावे नक्‍की झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभेच्या निवडणूक होणार असलेल्या एकूण 58 पैकी 6 जागा महाराष्ट्रात आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या संख्याबळानुसार त्यांना  प्रत्येकी एक जागा मिळू शकते. त्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता आहे.

माझे काम चांगले सुरू आहे, त्यामुळे कुणी चिंता करू नये. मी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत भेटलो आणि चर्चा केली. - नारायण राणे