Sun, Feb 23, 2020 02:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राणेंचा निर्णय 10 दिवसांत 

राणेंचा निर्णय 10 दिवसांत 

Published On: Aug 22 2019 1:48AM | Last Updated: Aug 22 2019 1:17AM
मुंबई : खास प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी बुधवारी थेट यंत्रणांवरच संशय व्यक्त करीत काही यंत्रणा महाराष्ट्रातील  नेत्यांना ब्लॅकमेल करीत असल्याचा गंभीर आरोप करताना आपण भाजपासोबत राहनार की नाही याचा निर्णय दहा दिवसात घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.   

एका वाहिनीला मुलाखत देताना राणे यांनी आपण पुन्हा भाजपासोबत राहणार की स्वाभिमान पक्षात जाणार याचा निर्णय दहा दिवसात घेऊ असे सांगितले. माझ्या भाजपा प्रवेशास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ग्रीन सिग्नल दिला असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात याची मी वाट पहात आहे, असेही राणे म्हणाले. भाजपने दिलेल्या आश्वासनांची अजून पूर्तता केलेली नाही. येत्या चार-पाच दिवसात मुख्यमंत्री याबाबत कळवणार असून त्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करीन असे राणे म्हणाले. 

नारायण राणे यांना भाजपाने राज्यसभेवर खासदारकी दिली गेली असली, तरी अजून त्यांचा अधिकृत भाजपा प्रवेश झालेला नाही. मला वेटिंगवर ठेवण्यात आले असले, तरी वेटिंगची एक मर्यादा असते, असेही राणे म्हणाले.

दरम्यान राणे यांनी अधिकृतपणे भाजपप्रवेश केल्यास त्यांचे दोन्ही चिरंजीव आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे हेदेखील भाजपमध्ये येतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र त्यामुळे सिंधुदुर्गातील समीकरणे बदलतील.
 
महाराष्ट्रातील नेत्यांना बदनाम करण्यासाठी काही एजन्सीज् कार्यरत असल्याचा गौप्यस्फोट करताना या एजन्सीजमार्फत राज्यातल्या नेत्यांना ब्लॅकमेल केले जात असून छगन भुजबळ हे अशाच एजन्सीचे बळी असल्याचा दावा राणे यांनी केला. मी त्या एजन्सीला शोधून काढले आहे. या एजन्सीत अनेक हुशार मंडळी कार्यरत आहेत. अनेक नेते या एजन्सीच्या लिस्टमध्ये आहेत. मात्र ते कुणासाठी काम करतात की केवळ पैशासाठी काम करतात हे माहित नसल्याचे राणेंनी सांगितले.