Sat, Sep 22, 2018 16:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नंदीबैलाची हत्या!

नंदीबैलाची हत्या!

Published On: Jan 12 2018 1:54AM | Last Updated: Jan 12 2018 1:19AM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

कल्याणच्या एपीएमसी मार्केट परिसरातून नंदी बैल चोरल्याच्या संशयावरून बाजारपेठ पोलिसांनी तिघा कसायांना बेड्या ठोकल्या आहेत. इम्रान वल्ली शेख, सलमान पटेल, तनजीब शकील शेख अशी या आरोपींची नावे असून त्यांनी मांसविक्रीसाठी नंदीबैलाची हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेनंतर कल्याण आणि भिवंडी परिसरातील कत्तलखाने पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

बीड येथे राहणारे महेंद्र भिसे यांच्या मालकीचा नंदीबैल आहे. नंदी बैलाचा खेळ करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. भिसे आपल्या नंदीबैलाला घेवून कल्याणात आले होते. दिवसभर खेळ करून ते रात्री पश्चिमेकडील एपीएमसी मार्केटमध्ये आश्रयाला थांबले होते. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते या ठिकाणी बैलाला बांधून झोपले. याचवेळी अज्ञाताने त्यांचा नंदीबैल चोरून नेला. रविवारी सकाळी चार वाजता जाग आली असता बैल आढळून न आल्याने त्यांनी शोधाशोध केली. मात्र, बैल कुठेही आढळून न आल्याने अखेर भिसे यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत इम्रान, सलमान आणि तनजीब या तिघांच्या मुसक्या आवळल्या. या त्रिकुटाने  भिसे यांचा नंदीबैल एपीएमसी मार्केटमधून पळवून त्याची मांसविक्रीसाठी हत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.