Wed, Jun 26, 2019 23:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाणार प्रकल्प रेटून नाही, तर चर्चेतून पुढे नेणार

नाणार प्रकल्प रेटून नाही, तर चर्चेतून पुढे नेणार

Published On: Jul 01 2018 2:16AM | Last Updated: Jul 01 2018 1:46AMमुंबई : प्रतिनिधी

कोकणात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प हा राज्याच्या व देशाच्या हिताचा आहे. मात्र, हा प्रकल्प रेटून नाही, तर चर्चेतून मार्ग काढत पुढे न्यावा, ही केंद्र व राज्य सरकारची भूमिका असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे सांगितले. नाणार प्रकल्पाला शिवसेनेकडून होत असलेल्या विरोधाबाबत मुख्यमंत्री स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व संबंधितांशी चर्चा करतील. प्रकल्पाला नेमका कशासाठी विरोध आहे, हे समजून घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल, असे ते म्हणाले.

एखादा विकास प्रकल्प राबवायचा असेल, तर त्यासाठी जमीन ही लागतेच. कोयना प्रकल्पासाठी लोकांनी जमिनी दिल्या नसत्या तर वीज प्रकल्प उभाच राहिला नसता, मुंबई - पुणे महामार्गासाठी लोकांच्या जमिनी घेण्यात आल्या, नाणार प्रकल्पासाठीदेखील जमिनीची आवश्यकता असून, त्याचा योग्य मोबदला त्या ठिकाणच्या लोकांना दिला जाईल. हा प्रकल्प रेटून नाही, तर सर्वसहमतीने चर्चा करून त्यातून मार्ग काढून पुढे न्यावा, अशीच सरकारची भूमिका आहे. या प्रकल्पातून जवळपास 15 हजार कोटींचा महसूल आणि 50 हजार नोकर्‍या उपलब्ध होतील, याचाही विचार केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुका तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना वेगवेगळे लढले होते. या निवडणुकांचे निकाल पाहता वेगळे लढूनसुद्धा या दोन्ही पक्षांना चांगले यश मिळाल्याचे दिसून येत आहे. आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र लढले, तर काँग्रेस-राष्ट्रवादी राज्यात औषधालाही उरणार नाही, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

आगामी निवडणुका या भाजप-शिवसेनेने एकत्रपणे लढवाव्यात, असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करण्याची भाजपची तयारी असून, शेवटच्या क्षणापर्यंत युतीसाठी प्रयत्न केला जाईल. एवढे करूनही शिवसेना जर वेगळे लढणार असेल, तर भाजपचीदेखील स्वतंत्र लढण्याची तयारी आहे, असे पाटील यांनी सांगितले.