Sat, Jul 20, 2019 08:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई विमानतळाचे नामकरण पेटणार!

नवी मुंबई विमानतळाचे नामकरण पेटणार!

Published On: Apr 23 2018 1:58AM | Last Updated: Apr 23 2018 1:56AMनवी मुंबई : योगेश मुकादम

भूसंपादन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, वन आणि पर्यावरण खात्याचे प्रश्न अशा अनेक दिव्यांतून गेल्यानंतर फेब्रुवारीमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन अखेर झाले. विमानतळासाठी अनेक नावे पुढे येत असल्याने आता नामकरणावरुन येत्या काळात वादंग उठण्याची शक्यता आहे. हा विषय हाताळताना केंद्र सरकारची देखील चांगलीच दमछाक होणार, असे चित्र आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही शिवाजी महाराजांचे नाव कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय अवजड उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते अनंत गीते यांच्याकडून आल्यानंतर नामकरणावरुन मोठी चर्चा सुरु झाली आहे. 

शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावासाठी आग्रही आहे तर आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे पनवेल तालुक्यातील शिरढोणचे असल्यामुळे त्यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांच्या हक्‍कासाठी हयात घालविणारे दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त हटून बसले आहेत तर माजी मुख्यमंत्री आणि रायगडचे सुपुत्र ए.आर. अंतुले यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करणारा एक गट सक्रिय झाला आहे. 

मुंबईमध्ये सध्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती शिवाजी महाराज देशांतर्गत (डोमेस्टीक) विमानतळ कार्यरत आहे. पुढील काळात तेथे केवळ डोमेस्टीक विमानतळ असेल. मुंबईला देशांतर्गत हवाई वाहतूक होईल. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही शिवाजी महाराजांचेच नाव राहील, अशी भूमिका गीते यांनी गेल्या आठवड्यात पनवेलमधील एका कार्यक्रमात मांडली. 

विमानतळाच्या विषयावरुन बॅकफुटवर गेलेली शिवसेना विमानतळाच्या नामकरणावरुन पुढील काळात अचानक प्रकाशझोतात आल्यास नवल वाटायला नको. विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी पूर्वीपासून शिवसेनेने केली होती. 2012  साली पनवेल येथे पार पडलेल्या अखिल आगरी समाज परिषदेच्या सातव्या महाअधिवेशनात तत्कालीन केंद्रीयमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विमानतळाला दिबांचे नाव देता येणार नाही, असे सांगत शिवाजी महाराजांचे नाव विमानतळाला देण्याचे सुतोवाच केले होते. 

मुंबईमधील विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव दिले असल्याने मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विमानळाला पुन्हा छत्रपतींचे नाव देण्याची आवश्यकता नसल्याची प्रतिक्रिया त्यावेळीही स्थानिकांनी व्यक्त केली होती.

Tags : Mumbai, Naming, Navi Mumbai Airport issue, Mumbai news,