Tue, Feb 19, 2019 10:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पुढील स्टेशन प्रभादेवी!(Video)

पुढील स्टेशन प्रभादेवी!(Video)

Published On: Jul 19 2018 1:41AM | Last Updated: Jul 19 2018 1:41AMमुंबई : प्रतिनिधी

एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनचे अखेर प्रभादेवी असे नामकरण झाले. प्रभादेवी मंदिरात देवीची पूजा करून आणि त्यानंतर एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनपर्यंत शोभायात्रा काढून बुधवारी मध्यरात्री 12 वाजता लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी आणि हजारो स्थानिकांच्या उपस्थितीत हा नामकरण सोहळा जल्लोषात पार पडला. 

सुमारे 300 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले प्रभादेवी मंदिर हे मुंबईतील प्रमुख देवस्थानांपैकी एक आहे. त्यामुळे येथील एल्फिस्टन रेल्वे स्थानकाचे नाव प्रभादेवी असे व्हावे ही समस्त मुंबईकरांची भावना होती. अखेर लोकमताचा आदर राखत केंद्र सरकारच्या परवानगीनंतर प्रभादेवी असे नामकरण झाल्याने खर्‍या अर्थाने मुंबईकरांची मागणी पूर्ण झाली आहे.

रात्री अकरा वाजता प्रभादेवी मंदिरातून निघालेली शोभायात्रा पावणे बारा वाजता रेल्वे स्थानकात पोहोचली. त्यानंतर बारा वाजता शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांच्या हस्ते या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी वरळी, दादर, प्रभादेवी भागातील हजारो नागरिक उपस्थित होते. रात्री आठ वाजल्यापासून नावाचे फलक प्रभादेवी असे लिहिण्यास सुरूवात झाली होती. तेव्हापासूनच स्थानकात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. नामकरण सोहळ्यापर्यंत ही गर्दी वाढत गेली आणि मध्यरात्री ‘प्रभादेवी’ देवीच्या जयघोषात सोहळा संपन्न झाला.