Sun, Mar 24, 2019 12:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव 

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव 

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 23 2018 1:25AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या विद्यापीठाला संत बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव देण्याची आग्रही मागणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करीत खानदेशवासियांची जुनी मागणी पूर्ण केली. 

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरील चर्चेवेळी एकनाथ खडसे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयत्री संत बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची सातत्याने मागणी होत असून अजून ही मागणी प्रलंबित असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव देण्याचा निर्णय जाहीर केला. 

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. तर, सोलापूर विद्यापीठालाही पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याला स्थगिती मिळाली आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव देण्याची मागणी विचारात घेता राज्य सरकार त्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.   

खान्देशच्या कन्येचा गौरव : अशोक जैन

उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाला खान्देश कन्या व लोककवियित्री बहिणाबाईंचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. हा निर्णय संपूर्ण खान्देशवासियांसाठी अभिमानाचा असून खान्देश कन्या बहिणाबाईचा हा सर्वाधिक सन्मानाचा गौरव आहे. हा निर्णय यापूर्वीच व्हायला हवा होता. खान्देशातील लोकप्रतिनिधी व जनतेने या मागणीचा वारंवार पाठपुरावा केला होता. बहिणाबाईंच्या परिवाराशी जैन उद्योग समुह खुप अगोदरपासून जुळलेला असून याचा आम्हाला आनंद आहे. अशी प्रतिक्रिया जैन उद्योग समुहाचे अशोक जैन यांनी व्यक्त केली.  जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष श्रध्देय पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांनी अत्यंत दूरदृष्टीने बहिणाबाई मेमोरिअल ट्रस्टची स्थापना केली होती. या ट्रस्टची रचना करताना श्रध्देय भवरलालजींनी बहिणाबाईंच्या सध्याच्या पिढीला  ट्रस्टमध्ये आग्रहाने सहभागी करुन घेतले आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून उत्कृष्ट साहित्य निर्मिती करणार्‍या साहित्यिकास पुरस्कारही दिला जातो. 

Tags : Mumbai, Mumbai news, North Maharashtra University, Bahinabai, Name,