Thu, Jun 27, 2019 18:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चारही आरोपींना आज न्यायालयात हजर करणार

चारही आरोपींना आज न्यायालयात हजर करणार

Published On: Aug 28 2018 1:45AM | Last Updated: Aug 28 2018 1:06AMमुंबई : प्रतिनिधी

नालासोपार्‍यात सापडलेल्या स्फोटके आणि स्फोटकांच्या साहित्यासह महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केेलेल्या वैभव राऊत, शरद कळस्कर आणि पुण्यातून अटक केलेल्या सुधन्वा गोंधळेकर यांच्यासह औरंगाबादेतून अटक केलेला सेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगरकर यांच्या कोठडीची मुदत मंगळवारी संपत आहे. त्यामुळे या चौघांनाही एटीएस वाढीव कोठडीसाठी न्यायालयात हजर करणार आहे. 

एटीएसने नालासोपार्‍यातील भंडारआळीमध्ये राहात असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेचा सक्रीय कार्यकर्ता राऊत याच्या घरी 9 ऑगस्टच्या रात्री छापेमारी केली. दुसर्‍या दिवशी सकाळी राऊत याच्यासह याच परिसरातून कळस्कर आणि पुण्यातून गोंधळेकर याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. तर तीघांच्याही चौकशीतून आर्थिक रसद आणि मदत पुरविणार्‍या पांगारकर यालाही एटीएसने बेड्या ठोकल्या. तर याच प्रकरणात एटीएसने माझगाव डॉकमधील कर्मचारी अविनाश पवार (30) याला शुक्रवारी रात्री बेड्या ठोकल्या आहेत. राऊत, कळस्कर, गोंधळेकर आणि पांगरकर यांच्या कोठडीची मुदत संपत असल्यामुळे एटीएस या चौघांनाही मंगळवारी सत्र न्यायालयात हजर करणार आहे. गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेली स्फोटके, स्फोटकांचे साहित्य, शस्त्रसाठा कोणी पुरविला याबाबत तपास, गुन्ह्याचा नेमका हेतू याचा तपास बाकी असल्याने चारही आरोपींच्या वाढीव कोठडीची मागणी एटीएस करणार असल्याची माहिती मिळते.