Tue, Oct 22, 2019 01:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नालासोपारा स्फोटकांप्रकरणी जळगावच्या ‘त्या’ दोघांनाही अटक

नालासोपारा स्फोटकांप्रकरणी जळगावच्या ‘त्या’ दोघांनाही अटक

Published On: Sep 09 2018 2:30AM | Last Updated: Sep 09 2018 2:14AMमुंबई : प्रतिनिधी

नालासोपारा स्फोटकांप्रकरणी तपास करत असलेल्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) जळगावमधून ताब्यात घेतलेल्या वासूदेव सुर्यवंशी (29) आणि विजय लोधी (32) या दोघांनाही शनिवारी रात्री अटक केली आहे. सुर्यवंशी याला गुरुवारी, तर लोधी याला शुक्रवारी एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दोघांचाही गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे एटीएसने स्पष्ट केले. 

नालासोपारा स्फोटकांप्रकरणी पहिल्या अटकेनंतर गेला महिनाभर एटीएस याप्रकरणाचा तपास करत आहे. याच तपासादरम्यान एटीएसने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडाचाही उलघडा केला. मात्र याप्रकरणातील आरोपींना स्फोटकांचे साहित्य आणि शस्त्रसाठा पुरविणार्‍यांपर्यंत एटीएस पोहचू शकले नाही. तसेच यामागील मास्टरमाईंडचाही शोध सुरु असल्याचे एटीएसने न्यायालयात स्पष्ट केले आहे. अशातच गुरुवारी सकाळी जळगावमध्ये कारवाई करत एटीएसच्या पथकाने वासूदेव सुर्यवंशी (28) या तरुणाला चौेकशीसाठी ताब्यात घेतले. तो मोटारसायकल गॅरेज चालवत आहे. सुर्यवंशीकडे कसून चौकशी सुरु असतानाच एटीएसने विजय लोधी (34) या त्याच्या मित्राला ताब्यात घेतले. दोघांच्याही घर झडतीमध्ये महत्वपूर्ण दस्तऐवज एटीएसच्या हाती लागले होते.

नालासोपारा स्फोटकांप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये आणखी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती देत, आरोपीला शनिवारी दुपारी बारावाजेपर्यंत न्यायालयात हजर करणार असल्याचे सांगणारा फोन एटीएसने आरोपींच्या वकिलांना केला होता. त्यानुसार शनिवारी आरोपीला विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार होते. वकिलसुद्धा न्यायालयात जाण्यासाठी निघाले. मात्र अजून अटक केली नाही. असे फोन करुन एटीएसने त्या वकिलाना सांगितले. त्यामुळे कारवाईबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर एटीएसने शनिवारी रात्री उशिरा दोघांनाही या गुन्ह्यात अटक केली. दोन्ही आरोपींना रविवारी सुट्टीकालीन सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. 

वासुदेव याने इतर संशयित आरोपींना राज्यभरात अनेक ठिकाणी रेकी करण्यासाठी वाहने पुरवली असल्याचा संशय एटीएसने व्यक्‍त केला आहे.  डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकर्‍यांनादेखील वासुदेवनेच वाहन पुरवले असल्याची शक्यता एटीएसने व्यक्‍त केली. या दोघांच्या अटकेवेळी एटीएसने  वासुदेव यांच्या गॅरेजमधून शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणारी सिडी तसेच बॉम्ब तयार करण्याचे साहित्य आणि विविध शहरांचे नकाशे जप्त केले. यामध्ये पुण्यातील सनबर्न फेस्टीवलच्या जागेचाही समावेश आहे. 

राज्यामध्ये घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीवरुन कारवाई करत एटीएसने 9 ऑगस्टच्या रात्री नालासोपार्‍यातील भंडाळअळीमध्ये छापेमारी करुन बॉम्ब आणि स्फोटकांच्या साहित्यासह वैभव राऊत याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्यापाठोपाठ याच परिसरातून शरद कळस्कर आणि पुण्यातून सुधन्वा गोंधळेकर यांनाही बेड्या ठोकल्या. गुन्ह्यामध्ये आर्थिक रसद आणि मदत पुरविल्याप्रकरणी मूळचा जालन्यातील रहिवाशी असलेल्या सेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पागांरकर यालाही गजाआड केले. तर बॉम्ब बनविणे, शस्त्र प्रशिक्षण, रेकी करणे या आरोपांखाली माझगाव डॉकमधून ताब्यात घेत अविनाश पवार याला याप्रकरणात अटक केली आहे.

नालासोपारा स्फोटकांप्रकरणी तपास करत असताना एटीएसने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्याचा उलघडा करुन शुटर सचिन अंधुरे याचा पर्दाफाश केला. सीबीआयने अंधुरे पाठोपाठ एटीएसने अटक केलेल्या कळस्करला ताब्यात घेत अटक केली. नालासोपारा स्फोटकांप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केलेला अमोल काळे हा मुख्यसुत्रधार असल्याचा दावा करणार्‍या एटीएसने मात्र त्याचा ताबा घेण्यासाठी हालचाली केल्या नाहीत. अखेर सीबीआयने बाजी मारुन काळेचा ताबा घेत त्याला अटक केली आहे. त्यामुळे एटीएस येत्याकाळा कोणत्या दिशेने तपास करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.