Mon, Aug 19, 2019 04:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वैभव राऊतसाठी हिंदुत्ववादी संघटना मैदानात

वैभव राऊतसाठी हिंदुत्ववादी संघटना मैदानात

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 10 2018 1:12AMनालासोपारा : वार्ताहर

नालासोपारा स्फोटके प्रकरणातील आरोपी हिंदुत्ववादी संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता वैभव राऊत याच्या समर्थनार्थ रविवारी नालासोपारा पश्चिमेतील धनंजय टॉकीज येथे विविध हिंदुत्ववादी संघटनांनी सभा घेतली. या सभेत वैभववरील आरोप खोटे असल्याचा दावा करण्यात आला.

वैभव राऊतने बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी घरी स्फोटके ठेवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र, हा आरोप खोटा असल्या दावा या सभेत करण्यात आला. वैभवच्या नजरेला नजर भिडवण्याची ताकद कोणात नाही, असे त्याचे कार्य आहे. त्यामुळे त्याला बॉम्बची गरजच नाही. देशात हिंदुत्ववादी संघटनेची सत्ता असताना त्यात वैभव नाहक भरडला जातोय हे त्याचे दुर्दैव आहे, अशी खंत शिवसेनेचे नेते शिरीष चव्हाण यांनी व्यक्त केली. 

गोरक्षणासाठी जीवाची पर्वा न करणार्‍या वैभवला दहशतवादी ठरवले जात आहे. त्याच्या निर्दोष मुक्ततेसाठी भंडारी समाज खंबीरपणे न्यायाचा लढा लढेल, असे आश्वासन नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी यावेळी दिले.

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या मीडियाने खरी बाजू मांडण्याऐवजी टीआरपीसाठी वैभला आतंकवादी घोषित केले, अशी टीका हिंदुत्ववादी संघटनेचे नेते शिवकुमार पांडे यांनी केली. 

मातृपितृ दिन, बाजीप्रभू देशपांडे बलिदान दिन साजरा करताना वैभवने मुलींना स्वरक्षणासाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण, धर्म प्रशिक्षण, शिवसेनाप्रमुख हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अतिरेकी म्हणणार्‍या तहलकाविरोधात आंदोलन, कन्हैया कुमारला विरोध,भग्नावस्थेतील हिंदू देवतांच्या मूर्तींचे विसर्जन, कत्तलखान्यात चालवल्या जाणार्‍या गायींचे रक्षण, गोमांसाची तस्करी रोखणे आदी नेक कामे वैभवने केली आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. 

देशभरात 54 ठिकाणी त्याचे देशभक्ती, हिंदु जनजागृती, धर्मरक्षा तसेच गोरक्षेचे काम सुरू होते. त्याने केलेली ही कामे गुन्हा ठरत असतील तर तो गुन्हेगार आहे, असे वैभवचे सहकारी  दिप्तेश पाटील म्हणाले.न्यायालयात वैभवची बाजू मांडणारे वकील संजीव पुनाळेकर यांचे सहकारी बलराज कुलकर्णी यांनीही यादरम्यान बोलताना आपले मनोगत व्यक्‍त केले. 

या सभेला विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, वैभव राऊतचे सहकारी आणि नालासोपारावासीय उपस्थित होते.