Tue, Jul 16, 2019 13:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › श्रीकांत पांगारकरचा रेकीमध्ये सहभाग

श्रीकांत पांगारकरचा रेकीमध्ये सहभाग

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 04 2018 12:53AMमुंबई : प्रतिनिधी

नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटक केेलेल्या पाचही आरोपींच्या चौकशीतून राज्यात आणि राज्याबाहेर घडलेल्या अन्य गुन्ह्यांच्या तपासालाही गती मिळाली आहे. तसेच आरोपींच्या मागच्या मास्टर माईंडचा शोध सुरु असून गुन्ह्याचा खोलवर तपास सुरु असल्याचे एटीएसने न्यायालयात सांगितले.आर्थिक रसद आणि मदत पुरविण्यासोबतच श्रीकांत पांगारकर हा अन्य आरोपींसोबत रेकी करण्यात सहभागी होता. त्याने रेकी केलेल्या अमरावतीमधील ठिकाणी जाऊन एटीएसने पंचनामा केला आहे. तसेच पांगारकरच्या आवाजाचे आणि हस्ताक्षराचे नमूने घेऊन ते तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये पाठविले आहेत. तसेच बनावट नंबरप्लेट आणि मोटारसायकलबाबत पांगाकरकडे तपास बाकी असल्याचे एटीएसने न्यायालयात स्पष्ट केले.

ती स्फोटकेच

नालासोपार्‍यातून जप्त केलेल्या स्फोटकांप्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल एटीएसला मिळाला असून त्यात ही स्फोटके असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे एटीएसच्या कारवाईला आणखी बळ मिळाले आहे. तसेच एटीएसने जालन्यातील ज्या फार्महाऊसवर आरोपींनी बॉम्ब तयार केले आणि शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेतले त्या फार्महाऊसवरील नमुने घेऊन तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठविले आहेत.

कोठडीची मुदत संपत आल्याने एटीएसचे पथक आरोपी शरद कळस्कर, वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगारकर यांना दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी न्यायालयासमोर हजर केले. यावेळी आरोपींनी कोणतीही तक्रार नसल्याचे एटीएसला सांगितले.

सीबीआयला आरोपी शरद कळसकर याचा ताबा देण्याचे आदेश दिल्यानंतर अ‍ॅड. प्रकाश सालसिंगीकर यांनी त्याच्यासोबत बोलायचे आहे असे न्यायालयाला सांगितले. आरोपींच्यावतीने न्यायालयात सादर केलेल्या वकिलपत्रात नाव होते. मात्र त्यावर सही नसल्याने न्यायालयाने अ‍ॅड. सालसिंगीकर यांना न्यायालयात वकिलपत्र देण्यास सांगितले. हे वकिलपत्र दिल्यानंतर त्यांनी कळस्करसोबत बातचीत केली.

फोनवरून आईसोबत बोलणे

नालासोपाराप्रकरणातून ताबा सीबीआयला दिल्यानंतर कळस्कर याने आईसोबत फोनवरुन बोलायचे आहे, असे वकिलांच्या मार्फत न्यायालयाला सांगितले. त्यानुसार त्याच्या आईचा नंबर तपासून बघण्यास एटीएसला सांगत न्यायालयाने ही परवानगी दिली. त्यानंतर न्यायालयाच्या बाहेरील आवारात जाऊन एटीएस पथकाच्या उपस्थितीत कळस्कर आईसोबत बोलला.

वैभव राऊत, शरद कळस्कर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगारकर या चारही आरोपींना एटीएस न्यायालयात हजर करणार असल्याने सकाळपासूनच त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक न्यायालयात येऊन बसले होते. न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर भेटण्यासाठी अर्ज केलेल्या काही नातेवाईकांना न्यायालयामध्येच आरोपींना भेटण्याची परवानगी मिळाली. नातेवाईकांन भेटल्यानंतर आरोपींच्या चेहर्‍यावर आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.

एटीएसकडून थेट सीबीआयकडे ताबा

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी शरद कळस्कर याचा ताबा सीबीआयला देण्याचे आदेश देतानाच गुन्ह्याच्या तपास अधिकार्‍याला आधी न्यायालयात बोलवा असे न्यायालयाने बजावले होते. न्यायालयाने कठोर भुमिका घेतल्याने चार वाजून पस्तीस मिनिटांनी तपास अधिकारी न्यायालयात पोहचले. कळस्करला कारागृहात पाठवून तेथून त्याचा ताबा घेण्यात लागणारा वेळ लक्षात घेऊन न्यायालयाने आपल्या अधिकारांचा वापर करत थेट एटीएसकडून सीबीआयला त्याचा ताबा दिला.