Mon, Apr 22, 2019 12:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नालासोपारा प्रकरण : आणखी १२ जण एटीएसच्या ताब्यात

नालासोपारा प्रकरण : आणखी १२ जण एटीएसच्या ताब्यात

Published On: Aug 12 2018 1:10AM | Last Updated: Aug 12 2018 1:09AMमुंबई : प्रतिनिधी

सणासुदीच्या काळात घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या वैभव राऊत याच्यासह तिघांना अटक केल्यानंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आणखी 12 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईसह पुणे, नालासोपारा, सांगली, सातारा, सोलापूर येथून या संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, एसटीएसची पथके त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत. येत्या काळात आणखी काहींची धरपकड केली जाण्याची शक्यता आहे.

नालासोपार्‍यातील भंडार आळीमध्ये रहात असलेल्या राऊत याच्या घरावर आणि घराशेजारी असलेल्या इमारतीतील दुकान गाळ्यांवर गुरुवारी रात्री एटीएस पथकाने छापे टाकून 20 देशी बॉम्बसह सुमारे 50 बॉम्ब बनतील एवढी स्फोटके आणि साहित्य, महत्त्वपूर्ण कागदपत्रे, तसेच दस्तऐवज ताब्यात घेतले. राऊत याच्या चौकशीतून नालासोपारा आणि पुण्यातून शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना ताब्यात घेत, शुक्रवारी अटक केली. तिन्ही आरोपींना न्यायालयाने 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, एटीएस या तिघांसह त्यांच्या सतत संपर्कात असलेल्या 12 जणांकडे चौकशी करत आहे.

राऊत याच्यासह कळसकर आणि गोंधळेकर यांच्याकडे सुरुवातीला एटीएसने स्वतंत्र चौकशी केली होती. त्यानंतर आता त्यांना एकमेकांसमोर बसवूनही चौकशी करण्यात येत असून, त्यातून काही खुलासे होण्याची दाट शक्यता आहे. राऊत हा नालासोपार्‍यातील स्थायिक असून, कसळकर हा मूळचा औरंगाबादचा आणि गोंधळेकर हा सातार्‍यातील असल्याने त्यांच्या गावच्या घरांवर एटीएसच्या पथकाने पाळत ठेवली आहे. तेथील संपर्कात असलेले तरुणसुद्धा एटीएसच्या रडारवर आले आहेत.

एटीएसच्या पथकाने नालासोपार्‍यातील आणखी एका घरांवर छापा टाकला. महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि एक संगणक संच जप्त केल्याची माहिती मिळते. घर नावावर असलेल्या तरुणाची राऊतसोबत चांगली मैत्री आहे. राऊतच्या सांगण्यावरूनच या तरुणाने सनातनच्या दोन तरुणांना काही दिवस या घरामध्ये ठेवले होते. कळसकर यालाही याच घरातून ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे.

हिंदू संघटनांसाठी काम करत असलेला राऊत हा परिसरात इस्टेट एजंट म्हणून काम करायचा. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून त्याने सोशल मीडिया वापरणे बंद केल्याचे तपासात समोर आल्याने एटीएसने त्यादृष्टीनेही त्याच्याकडे चौकशी सुरू केली आहे. तर गोंधळेकर याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यासह त्याने सनातनमध्ये लिहिलेले लेखही तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत असलेला गोंधळेकर हा पुण्यात वास्तव्यास असला तरी सातारा, सांगली, सोलापूरमधील तरुणही त्याच्या संपर्कात असल्याने त्याच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळेल, असे एटीएसच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

मूळचा औरंगाबादेतील शेतकरी कुटुंबातील असलेला कळसकर हा गेेल्या चार ते पाच वर्षांपासून कोल्हापूरमध्ये वास्तव्यास असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले होते. तसेच तो दर महिन्याला काही पैसे घरीसुद्धा पाठवत होता. परंतु, तो नालासोपार्‍यात सापडल्याने त्याच्या कोल्हापूर कनेक्शचे गूढही एटीएसच्या चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे.

नातेपुते येथे दोघांची चौकशी

नातेपुते : आमचे वार्ताहर सुनील गजाकस यांनी दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने सुधन्वा गोंधळेकर यांच्या संपर्कातील नातेपुते येथील प्रसाद देशपांडे व अवधूत पैठणकर यांची कसून चौकशी केली.

संशयित सुधन्वा गोंधळेकर सात ऑगस्टदरम्यान नातेपुतेमध्ये या दोघांच्या घरी मुक्‍कामी होता.त्याचबरोबर त्यांच्या कॉल डिटेल्सवरूनच एटीएस पथकाने देशपांडे व पैठणकर यांच्या नातेपुतेमधील घरावर सकाळी धाड टाकली. तपासासाठी गोंधळेकर यालाही  नातेपुते येथे आणण्यात आले होते. 

संशयित आरोपी सुधन्वा गोंधळेकर याचे धागेदोरे शोधण्यासाठी एटीएस पथकाने त्याच्या मुक्‍कामाच्या ठिकाणी व कॉल रेकॉर्डवरून संपर्कातील इसमांची पथकाकडून चौकशी करण्यात येत आहे.